दूध भेसळीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अनेक दूध संकलन केंद्रांवर दूधामध्ये भेसळ करण्यात येत आहे.दूध उत्पादन वाढवण्यासाठी काही स्वार्थी लोक रासायनिक पदार्थ आणि इतर अशुद्ध घटक दूधामध्ये मिसळत आहेत,ज्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दूध भेसळ ही फक्त आर्थिक फसवणूक नसून,ती लोकांच्या जीवनाशी संबंधित एक गंभीर मुद्दा बनला आहे. सध्या लोकांना मिळणारे दूध हे अनेक वेळा शुद्ध असत नाही.शेतकऱ्यांच्या कष्टाची कदर न करता, भेसळ करणारे काही लोक याला आपल्या नफ्याचे साधन बनवत आहेत.
यामुळे दूध विकत घेत असलेले नागरिक, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूध भेसळ करणाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. भेसळ बंद झाल्यास शेतकरी किमान ५०-७० रुपये प्रति लिटर भाव मिळवू शकतात,परंतु भेसळ करणाऱ्यांमुळे त्यांचे कष्ट आणि मेहनत फोल जात आहे.यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर सुधारण्यास अडचण निर्माण झाली आहे.
दूध भेसळीला रोखण्यासाठी नागरिकांनी एकजूट होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि नागरिकाच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल. दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा करूनच शुद्ध दूध मिळवता येईल.
शेतकऱ्यांच्या कष्टाची योग्य किंमत मिळवण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य वाचवण्यासाठी या भेसळीविरोधी लढ्याला समर्थन देणे महत्त्वाचे आहे.प्रशासनाने त्वरित कारवाई करून प्रशासन अस्तित्वात आहे,याचा पुरावा द्यावा.
अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दूध भेसळीच्या मुद्द्द्यावर प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.त्यांच्या निवेदनात त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत.दूध भेसळ करणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करावी.अटक झालेल्या तोतया लोकांकडून भेसळीचे साहित्य व इतर नमुने हस्तगत करावेत.
खरे भेसळखोर आणि त्यांच्या संपर्कातील लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करावी.भेसळखोरांना कठोर शिक्षा दिल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि दूधाच्या दरात वाढ होईल.दूध विकणाऱ्या नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी शुद्ध दूधच उपलब्ध करावे.