परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ काल बुधवारी (दि. १८) आरपीआयने पुकारलेल्या बंदच्या दरम्यान आंदोलकांची सभा झाल्यानंतर शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला काहीसे गालबोट लागले.काल शहरातील नवी पेठ येथे काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली.
त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शहर बंदच्या आवाहानास शहरातील व्यापारी संघटनेने पाठींबा देऊन काल दुपारी बारा वाजेपर्यंत आपआपली दुकाने बंद ठेवून पाठींबा दिला होता.
त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत राहुरीत बंद पाळण्यात आला.परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने राहुरी शहरात बंद पाळून निषेध मोर्चा काढला होता.या दरम्यान आरपीआयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी बस स्थानकपासून मुक मोर्चाला सुरुवात केली.
शहरातील नवीपेठ, पृथ्वी कॉर्नर, आडवी पेठ, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनिचौक येथे निषेध सभा झाली.पावणेबारा ते सव्वाबाराचे दरम्यान नंतर मोर्चा पुन्हा नवीपेठ मार्गे बस स्थानकाकडे जात असताना नवीपेठ येथील काशिद यांचे बापू हलवाई व जेजूरकर यांचे जे जे इलेक्ट्रॉनिक्स हे दोन दुकान चालू होते.
यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या दोन दुकानांवर हल्ला करत दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली.मात्र आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे व काही आंदोलकांनी शांततेची भूमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
घडलेल्या प्रकारची आरपीआय नेते विलास नाना साळवे, सुनील चांदणे यांनी व्यापाऱ्यांची माफी मागून व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करण्याचे आवाहन केले.मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
त्यानंतर आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे, सुनील चांदणे, बाळासाहेब जाधव, सागर साळवे, निलेश शिरसाठ, अरुण साळवे, दिपक साळवे, सचिन साळवे,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, सुर्यकांत भुजाडी, अनिल भट्टड, अनिल कासार, संजीव उदावंत, राजेंद्र दरक, पवन अग्रवाल
दिपक मुथा, आनंद बाफना, अनील सुराणा, प्रफुल उदावंत, संतोष लोढा, नंदुशेठ भट्टड, अनिल कासार, सुनील निमसे, संदिप सोनवणे आदींसह नवी पेठेतील व्यापाऱ्यांसह शहरातील सर्वच व्यापारी पोलीस स्टेशन येथे गेले होते.
त्यावेळी आरपीआयचे प्रमुख कार्यकर्तेही पोलीस स्टेशन येथे आले,त्यांना वाटले व्यापारी गुन्हे दाखल करण्यासाठीच आले आहे,मग आम्हालाही गुन्हा दाखल करायचा आहे.दोन्ही गट समोरासमोर आले असता, त्यात व्यापाऱ्यांची भूमिका होती की, व्यापाऱ्यांनी आपल्या सूचनेनुसार अर्धा दिवस बंद ठेवले असताना जो प्रकार घडला तसा प्रकार पुन्हा घडू नये, याबाबत पोलीस निरीक्षकांना त्याबाबतीत निवेदन देण्याचा हेतू होता.
तर आंदोलकांना आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठीच व्यापारी आले अशी चुकीची माहिती मिळाली.त्यामुळे थोडा वादावादी झाली अखेर व्यापारी व आंदोलक यांच्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या समोर चर्चा होऊन या घटनेवर पडदा टाकण्यात आला.दुपारी उशिरापर्यंत राहुरी शहरातील बाजारपेठ पूर्ववत सुरु झाली होती.