रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना शिर्डी पोलिसांनी १४ लाखांचा गांजा, १२ लाखांचे चारचाकी वाहन व मोबाईल, असा एकूण २६ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी मंगळवारी रात्री गांजा मालाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन धडक कारवाई केली आहे.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी परिसरात जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नाकाबंदी केली जाते.

त्या अनुषंगाने मंगळवारी (दि. १०) डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास राहाता तालुक्यातील नगर-मनमाड रोडवर असलेल्या सावळी विहीर फाटा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे व पोलीस पथकाच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करत होते.

तेव्हा रात्री बारा वाजून ३० मिनिटांनी एका ग्रे रंगाची इनोव्हा कार क्रमांक (एमएच १४ बीआर ७८७१) ही समृद्धी महामार्गावरून उतरुन कोपरगावच्या दिशेने शिर्डीकडे येत असताना पोलिसांनी तिची तपासणी केली.

तेव्हा तिच्या मागील डिक्कीची तपासणी केली असता, त्यात उग्र वास आल्याने खात्री केली असता, ४६ पाकिटात अंदाजे ९६ किलो वजनाचा गांजा मिळून आला.

सदर गांज्याची किंमत अंदाजे १४ लाख ४३ हजार असून चारचाकी वाहनाची किंमत अंदाजे १२ लाख रुपये व दहा हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल,असा एकूण २६ लाख ५३ हजार ४०५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदरचा गांजा हा अर्जुन धोंडीराम कांबळे (वय ३७, रा. निमगाव कोराळे) याच्याकडे मिळून आला असून तो गांजा कुठून आणला. तसेच तो कोठे विक्री करणार होता.त्याबरोबर त्याला आणखी कोणी साथीदार आहे का, याचा देखील आतिशय बारकाईने शोध सुरू आहे.

त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याप्रमाणे पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरच्या कारवाईत पोलीस कर्मचारी गजानन गायकवाड, गणेश घुले, केवल राजपूत, प्रसाद सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला आहे.