एसटी बसमध्ये चढत असलेल्या दोन महिलांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने लांबविल्याच्या दोन घटना काल सोमवारी (दि. १६) दुपारी संगमनेर बस स्थानकामध्ये घडल्या.संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दागिने चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहे.त्यामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे.

याबाबत येथील शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लता शरद घुगे (वय ४९, रा. सोनगाव शिंगवेटरोड, साईखेडा, ता. निफाड) ही महिला संगमनेर बस स्थानकामध्ये एसटी बसची वाट पाहत थांबलेली होती.काल दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ती नाशिक बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तिची पर्स लांबविली.

या महिलेच्या पर्स मधील ७० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी असलेले गंठण पोत, ७२ हजार रुपये किंमतीचे सोन्याची मोहन माळ, १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले जोड, ६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पान, ४ हजार रुपये किंमतीचे सोन्याची रिंग

५ हजार रुपये किंमतीचे अन्य दागिने, ६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनी,२ हजार रुपयांचे चांदीचे दागिने व २ हजार रुपये रोख,असे एकूण १ लाख ७९ हजार रुपये किंमतीचे दागिने घेवून चोराने पलायन केले.

या चोरीबाबत लता घुगे या महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.तर दुसरी घटना संगमनेर बस स्थानकामध्ये काल सोमवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली.

शुभांगी रवींद्र कासार (वय ४०, रा. पुणे) ही महिला संगमनेरहुन पुण्याकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने या महिलेकडे १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवले.याबाबत सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.