राहुरी तालुक्यातील करजगाव येथे प्रवरानदी पात्रातून गट नंबर १५३/२ च्या लगत उत्तरेस करजगाव- बेलापूर खुर्द डांबरी रस्त्यावर करजगाव हद्दीतील प्रवरानदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन, उपसा करून ब्राह्मणगाव भांड कडे जाणारी वाहने ग्रामस्थांनी पकडून पुढील कारवाईसाठी राहुरी महसूल पथकाकडे जमा करून पुढील वाळू उपसा आक्रमक भूमिका घेत कायमस्वरूपी बंद केला.
गेल्या अनेक दिवसापासून करजगाव येथील प्रवरानदी नदीपात्रातून रात्रंदिवस लाख येथील शासकीय डेपोच्या नावाखाली वाळू उत्खनन चालू होते.परंतू काही गाड्याद्वारे अवैध वाळू डेपोवर खाली न करता परस्पर बेकायदेशीर विक्री केली जात होती.ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार करूनही अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे ग्रामस्थांनी पर्यायाने आक्रमक भूमिका घेऊन अवैध वाळूउपसा करणाऱ्या गाड्या पकडून कार्यवाहीसाठी तहसील कडे जमा केल्या आहे.शनिवारी सकाळी साडेदहा वाजता करजगाव ग्रामस्थांनी एमएच ४३ वाय १४२९ व एमएच १७ टी ९८१५ ही वाहने ताब्यात घेतली आहेत.तसेच एमएच १४ एएस ९७२५ हे वाहन वाळूने भरलेल्या डेपोकडे न जाता परस्पर विक्रीसाठी जात असताना पकडले आहे.
याबाबत ग्रामस्थांनी एमएच ४३ वाय १४२९ च्या वाहन चालकाकडे पंचांनी विचारणा केली असता डेपोकडे न नेता परस्पर ब्राह्मणगाव भांड शिवारात खाली केल्याचे सांगितले.तसेच गाडी क्रमांक एमएच १७ टी- ९८१५ च्या वाहन चालकाकडे विचारणा केली असता प्रवरानदी पात्रात उत्खनन करून डेपो कडे न जाता नरसाळी तालुका श्रीरामपूर शिवारात खाली केली असल्याचे सांगितले.
सदर उत्खननाच्या ठिकाणाहून गेल्या चार दिवसापासून उत्खनन करून डेपोवर न जाता परस्पर बेकायदेशीर पणे कुठल्याही प्रकारची पावती अथवा शासकीय परवानगी न घेता विक्रीसाठी जात असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गाड्या ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी देवळाली प्रवराचे मंडलाधिकारी व राहुरी महसूल पथकाच्या ताब्यात देऊन बेकायदेशीर रित्या चालू असलेला वाळू उपसा कायमस्वरूपी बंद केला आहे.
यावेळी माजी सरपंच गणेश कोतकर, बाळासाहेब कोतकर, नवनाथ कोतकर, काकासाहेब आरंगळे, सुदाम कोतकर, अण्णासाहेब देठे, शंकर कोतकर, नरेंद्र कोतकर, जावेद पठाण, अविनाश आरंगळे, बबन लोंढे, सोमनाथ कोतकर,लक्ष्मण देठे,अमोल कोल्हे, खंडू गांगुर्डे, किरण आरंगळे, सोमेश्वर कोतकर, अजय कोतकर आदींसह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती.