सोमवारी पहाटे खंदरमाळ शिवारातून वाहनातील डिझेलचीच चोरी झाल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी एका दुकानावर छापा घालण्यास पोलिसांना भाग पाडले.अखेर अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या डिझेल चोरीच्या प्रकरणामागील रहस्य उघड झाले.
या प्रकरणी खंदरमाळच्या प्रवीण लेंडे यांच्या तक्रारीवरुन घारगाव पोलिसांनी डिझेल चोरी व त्याची साठवणूक करणाऱ्या चंद्रकांत उर्फ साईनाथ गणेश शेळके याला अटक केली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. खंदरमाळ येथे राहणारे प्रवीण लेंडे रविवारी (दि. १५) आपल्या मालकीच्या ट्रक मधून पशूखाद्य घेवून सटाणा येथून घारगावला आले.त्यांनी हिवरगाव पावसा येथील पेट्रोलपंपावरुन आपल्या वाहनात डिझेल भरले.
खंदरमाळ नजीकच्या १९ मैलांवर राहणाऱ्या आपल्या मित्रांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत गाडी लावून ते घरी गेले.त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास लेंडे मित्राच्या घरी आले,त्यांनी आपल्या वाहनाच्या डिझेलची टाकी तपासली असता ती व्यवस्थित होती.
सोमवारी (दि.१६) सकाळी साडेसातच्या सुमारास परिसरात राहणाऱ्या त्यांच्या एका नातलगाला मालट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याची माहिती प्रवीण लेंडे यांना दिली.
त्यांनीही लागलीच येवून आपले वाहन तपासले असता टाकी रिकामी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.या घटनेनंतर संबंधित वाहन मालकासह त्यांच्या अन्य नातेवाईक व मित्रांनी आसपास शोध घेतला असता त्यांना कोणताही मागमूस लागला नाही.
ही बाब खंदरमाळात समजताच ५० ते ६० गावकरी वाहनमालक प्रवीण लेंडे यांच्यासह घारगाव पोलिस ठाण्यात आले.त्यांनी डिझेल चोरीची माहिती देण्यासह संशयीत असलेल्या परिसरातील साई गणेश वॉशिंग सेंटरवर संशय व्यक्त करीत तेथे छापा घालण्याची मागणी केली.
सुरुवातीला पोलिसांनी काहीसे आडेवेढे घेतल्याने उपस्थितांचा संशयही बळावला, मात्र सदरची बाब लक्षात येताच पोलिसांनी ग्रामस्थांसह ‘त्या’ ठिकाणी जावून त्यावेळी बंद असलेल्या वॉशिंग सेंटरचे शटर तोडून आत पाहीले असता आतील भागात दोन हजार लिटर क्षमतेच्या टँकसह अनेक छोटे- मोठे ड्रम आणि त्यात कमी-अधिक प्रमाणात डिझेल असल्याचे उघड झाले.
नंतर पोलिसांनी दुकानातील सर्व मुद्देमाल ताब्यात घेत दुकान मालकाचा शोध घेतला असता तो आढळून आला.या प्रकरणी प्रवीण लेंडे यांच्या फिर्यादीवरुन खंदरमाळ येथील चंद्रकांत उर्फ साईनाथ गणेश शेळके (वय २५) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.