मराठवाडा हद्दीच्या गोदावरी पात्रातील वाळूची बेसुमारपणे होणारी चोरटी वाहतूक शेवगाव तालुक्यातील हातगाव, मुंगी परिसरातून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, वाळू वाहतूक करणाऱ्या एकाही गाडीला नंबर नाहीत.सर्व गाड्यांचे नंबर खोडून टाकले असून, या कामी महसूलसह पोलिस यंत्रणाही अर्थपूर्ण संबंधामुळे डोळेझाक करत असल्याने या दोन्हीही विभागाचे नेमके चालले आहे तरी काय, असा प्रश्न नागरिकांतून होताना ऐकावयास मिळत आहे.

मुंगी, हातगावपासून अवघ्या ५ ते ६ किलोमीटर अंतरावर मराठवाड्याची हद्द असून, लगतच गोदावरी पात्र असल्याने या पात्रातील वाळूचा राजरोसपणे उपसा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.उपसा केलेली सर्व वाळू विक्री केल्यानंतर तिची वाहतूक रात्रभर मुंगी, हातगाव परिसरातून बोधेगाव, पाथर्डी व शेवगावकडे होत आहे.

त्यातच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महसूल प्रशासन गुंतले गेल्याने त्याचा गैरफायदा घेऊन वाळूतस्करांनी वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली आहे.ती अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.वाळूतस्कर व पोलिस यंत्रणेची मिलिभगत बोधेगाव परिसरातून वाहतूक करत असलेल्या या सर्व गाड्या शेवगाव पोलिस स्टेशनसमोरून, तसेच बोधेगाव पोलिस दूरक्षेत्रासमोरून राजरोसपणे वाहतूक करत आहे.

असे असूनही पोलिस यंत्रणा या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यास कुचकामी ठरत असल्याने बाळूतस्कर व पोलिस यंत्रणेची मिलिभगत तर सुरू नाहीना अशी चर्चा नागरिकांतून होत आहे

वाळू वाहतूक करणाऱ्या एकाही गाडीला नंबर नाहीत सर्व गाड्यांचे नंबर खोडून टाकले असून,वाळू वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्या इतक्या वेगाने चालतात की अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे.प्रत्येक गाडीच्या मालकाकडे छोट्या चारचाकी असून ते वाहतूक होत असलेल्या मार्गावर रात्रीच्या वेळी ठीक ठिकाणी थांबून राहत आहेत.

मोबाईलद्वारे एकमेकांशी संपर्क साधून गाडी पकडली जाणार नाही याची काळजी घेत आहेत. वाळू भरून आलेल्या आपल्या गाडीपुढे २ किलोमीटरच्या अंतरावर पुढे-पुढे चालत असून, वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीचालकाला वेळ पडल्यास मोबाईलद्वारे संपर्क करत असल्याने या कामी महसूल व पोलिस यंत्रणाही कशी फोल ठरेल,अशीही काळजी वाळूतस्करांकडून घेतली जात असल्याचे ऐकावयास मिळत आहे.