कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे शिर्डी-सुरत राज्य मार्गावरील गोदावरी नदीच्या पुलाखाली पाच वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळलेल्या मृतदेहाची माहिती दुपारच्या सुमारास नदीकाठी गेलेल्या काही स्थानिकांनी पोलिसांना दिली.रात्री उशिरापर्यंत मुलाची ओळख पटली नव्हती.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की स्थानिकांना नदीमध्ये संशयास्पद वस्त्र तरंगताना दिसल्यावर त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता,तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.याबाबत त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक वैशाली मुकणे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला.प्राथमिक तपासात मृत मुलाच्या शरीरावर जखमा असल्याचे आढळून आले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून,मृत मुलाच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात असून चौकशी केली जात आहे.या घटनेने तालुक्यात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.स्थानिकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
तसेच, या प्रकरणामुळे मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवा आणि त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करा,असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनेविषयी कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.तसेच,अफवा पसरवून तपासात अडथळा आणू नये,असेही नागरिकांना बजावले आहे.या निर्दयी घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले असून,समाजाला पुन्हा एकदा अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.