जामखेड तालुक्यात विविध गावांमध्ये घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली.त्यांच्याकडून दोन लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून,सहा गुन्हे घडकीस करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

निंबाळकर आसाराम भोसले (वय ३६, रा. रूटी, ता. आष्टी, जि.बीड), आहिलाश्या उर्फ जाधव उर्फ झोळया जंगल्या भोसले (वय ५०, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड), कौशल्या अहिलाश्या भोसले (वय ३५, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड), महादेव सुखदेव भोसले (वय ५५, रा. चिखली, ता. आष्टी,जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जामखेड तालुक्यातील धोत्री येथील काकासाहेब रामदास अडाले हे ३ डिसेंबर २०२४ रोजी कुटुंबीयासह विवाह सोहळ्या करिता बाहेरगावी गेले होते.

चोरांनी त्याच्या घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली.याबाबत अडाले यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.जामखेड तालुक्यात घरफोडीचे गुन्हे वाढल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे उघडकीस आणण्याचा आदेश दिला.

त्यानुसार आहेर यांनी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात व पोलिस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके, फुरकान शेख, संतोष खैरे,भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, ज्योती शिंदे, सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांचे पथक नेमून आरोपींच्या शोधाकामी रवाना केले.

तांत्रिक विश्लेषणाआधारे पोलिस पथकाला माहिती मिळाली की वरील गुन्हा निंबाळकर आसाराम भोसले (रा.आष्टी, जि. बीड) याने त्याच्या साथीदारांसह केला आहे.तो चोरीचे सोने विक्रीसाठी गुगळे प्लॉटिंग, जामखेड येथे येणार आहेत.त्यानुसार पथकाने जामखेडमधील गुगळे प्लॉटिंग येथे सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतले.त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली.

त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी महादेव सुखदेव जाधव त्याच्या ताब्यातून ७० हजाराचे सोने, १५ हजारांचे मोबाईल, आरोपी निंबाळकर आसाराम भोसले याचे ताब्यातून ७० हजारांचे सोने,आरोपी आहिलाश्या भोसले यांच्या ताब्यातून ७५ हजारांची दुचाकी असा एकूण २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केले.

वरील गुन्हा रामेश्वर जंगल्या भोसले (रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि.बीड) याच्या मदतीने केला आहे. गुन्ह्यातील चोरलेले सोने कौशल्या अहिलाश्या भोसले हिचे मदतीने महादेव सुखदेव जाधव यास विकण्यासाठी आलो होतो, अशी माहिती सांगितली आहे.

आरोपींकडून जामखेड व खर्डा पोलिस ठाण्यात दाखल असलेले सहा गुन्हे उघडकीस आले. आरोपींना पुढील तपासकामी जाखमेड पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.