झाडं जगली तर सावली मिळेल,फळं खायला मिळतील आणि मुख्य म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.पावसाचं प्रमाण चांगलं मनाजोगतं राहिल. राज्यशासनाने ‘झाडे लावा,झाडे जगवा’ हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी वनविभागामार्फत लाखो रुपये खर्च केले.परंतु नेवासा तालुक्यात शासनाचा हा संदेश केव्हाच नजरेआड गेलाय.

अक्षरशः वन अधिकाऱ्यांच्या संगनमतानं किंबहुना वरदहस्तानं नेवासा तालुक्यात हजारो झाडांची बेसुमार कत्तल सुरू असल्याचे आरोप नागरिकांमधून केली जात आहे.नेवासा तालुक्याच्या पूर्व भागातील वाकडी, प्रिंपीशहाली, सुकळी, नांदूरशिकारी, दिघी, खलालप्रिंपी, सलाबतपूर, गोंडेगाव, गेवराई, खामगाव, शिरसगाव, वरखेड यासह आदी गावातल्या शिवारातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे.

त्यासाठी अत्याधुनिक कटर मशीनचा वापर केला जात आहे.दररोज पाच ते सहा ट्रॅक्टर तसेच टेम्पोच्या सहाय्याने लाकडांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असताना वनविभाग झोपेचे सोंग का घेतो,असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

शिरसगावसह अन्य परिसरात दिवसा ढवळ्या तसेच रात्री-अपरात्री छोट्या-मोठ्या झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड केली जाते.राजरोसपणे लाकडाने भरलेल्या गाड्या रस्त्यावरून भरधाव वेगाने धावताना दिसून येत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसत का नाही,असा सवाल शेतकरी,वृक्ष प्रेमी तसेच ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

दरम्यान,अवैध वृक्ष तोडीवर वनविभागाने वेळीच लगाम लावून भविष्यात वृक्षाअभावी होणारी नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे तसेच अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुक्याच्या पूर्व भागातील वृक्षप्रेमी तसेच ग्रामस्थांकडून केली जात आहे.

अवैद्य बेकायदेशीर लाकडांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वनविभागाने कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शासन करावे आणि वनसंपदेला वाचवावं, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

खुले आम होत असलेली वृक्षतोड ही वनविभागाला माहित नाही की,माहित असून मुद्दाम कानाडोळा केला जातोय,असा प्रश्न वृक्षप्रेमींना पडला आहे. या प्रकरणामुळे नेवासा तालुक्यातील पूर्व भागातील वनसंपदा धोक्यात आली आहे.

त्यामुळे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन होणारी अवैध वृक्ष तोड त्वरीत थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असे नेवासा तालुक्याच्या वसुंधरा प्रतिष्ठानचे अमृत फिरोदिया यांनी सांगितले.

नेवासा तालुक्याचे वृक्षतोडीचे चित्र पाहिले तर येथे सूर्योदया अगोदर वृक्षतोड सुरू होते.लाकडांची वाहतूक रात्रीच्या सहानंतर सुरू होते.सूर्यास्तानंतर कोणत्याही प्रकारची लाकडांची वाहतूक करायला कायद्याने बंदी आहे, तर रात्रीच्या वेळी झाडे तोडण्यासही कायद्याने बंदी आहे.मात्र नेवाशामध्ये झाडांची बेसुमार कत्तल करणारे हा कायदा सर्रासपणे पायदळी तुडवत आहेत.