१० जानेवारी २०२५ देवळाली प्रवरा : मोटारसायल घेण्यासाठी बँकेत कर्ज मागायला गेलेल्या व्यक्तीच्या नावावर आधीच ४.५ लाख रूपयांचे कर्ज असल्याचे समजताच त्याला मोठा धक्का बसला आहे.नकली आधारकार्ड, पॅनकार्ड वापरून या इसमाची ४.५ लाख रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
राहुरी तालुक्यातील मालुंजा खुर्द मधील रहिवाशी नितीश दादासाहेब पवार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोटार सायकल घ्यायची असल्यामुळे आपण आयडीएफसी बँक, शाखा – श्रीरामपूर येथे कर्जासाठी अर्ज केला.पण,तेथील अधिकाऱ्याने सिबील चेक केल्यावर माझ्या नावावर पहिलेच कर्ज असल्याचे त्याने सांगितले.
तेव्हा आपण कधीही, कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतले नसल्याचे सांगितले.तेव्हा मनीश अनिल पालव, उल्हासनगर याने तुमच्या खात्याला जॉईंट अकाऊट करून वेगवेगळ्या ठिकाणांहून कर्ज घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यानुसार विविध बँका तसेच फायनान्स कंपन्यांकडून जवळपास ४ लाख ४५ हजार ७६ रूपयांचे कर्ज सदर व्यक्तीने घेतले.त्यापैकी २ लाख २९ हजार ८७० रूपये कर्ज भरणे बाकी आहे.
सदर व्यक्तीने आपली सहमती नसताना आपल्या आधारकार्ड व पॅनकार्डचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर ४ लाख ४५ हजार ७६ रूपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर फिर्यादीवरून उल्हासनगर येथील मनीश अनिल पालव याच्या विरूद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहेत.