दुचाकी व चार चाकीसह अन्य वाहनांवर कर्ज घेतलेले असले तर कर्ज परतफेड केल्यानंतर संबंधित बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी घेणे आवश्यक आहे.एनओसी घेऊन वाहनाच्या कागदपत्रांवरील कर्जाचा बोजा कमी करणे आवश्यक आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात शेकडो वाहनधारकांनी कर्ज परतफेड करूनही त्यांच्या वाहनांवर बोजाची नोंद असल्याची दिसून येते.अनेक चालक वाहन खरेदी करण्यासाठी राष्ट्रीयीकृत,तसेच खासगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज काढतात.

वाहन खरेदीसाठी अनेक बँका, पतसंस्था व फायनान्स कंपन्या सवलतीच्या दरात व तत्काळ कर्ज उपलब्ध करून देतात. दोन, तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसाठी त्यांच्याकडून कर्ज देण्यात येते.

कर्ज संपल्यानंतर बँकांकडून एनओसी घेऊन परिवहन कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण करावी लागते.कर्ज फेडले आणि बँकेकडून एनओसी घेतली की आपले काम झाले असे समजू नये.वाहन कर्ज फेडल्याची बँक एनओसी घेतल्यानंतर आरटीओतून तशी पूर्तता करणे आवश्यक असते.

बँकेकडून घेतलेली एनओसीची मुदत ही तीन महिन्यांसाठी असते.आरटीओ कार्यालयात भेट देऊन पुढील कार्यवाही पूर्ण करावी लागते.तीन महिन्यांनंतर मात्र पुन्हा एनओसी घेणे गरजेचे ठरते.

कर्जाची परतफेड केल्यानंतर हाइपोथिकेशन रिमूव्हल करणे गरजेचे आहे.वाहन खरेदी केल्यानंतर आरटीओच्या रेकार्डमध्ये कर्जाचा तपशील असतो.बँकेची माहिती असते.कर्ज फेडल्यानंतर आरसी बुकवरून बँकेचा तपशील काढावा लागतो.

वाहनावरील कर्जाचा भार कमी करा कारण कर्जाचा भार कमी केल्याशिवाय वाहनांचे हस्तांतरण होत नाही आणि वाहनाची विक्रीहि करता येत नाही.