वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने ‘वयोश्री’ योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ अनेकांना होत आहे.वयाच्या पासष्टीनंतर समस्या उद्भवणारांना तीन हजार रुपये या योजनेतून मिळणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी ही योजना आहे.परंतु १४ ऑक्टोबरपर्यंत ज्या ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले,त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला.त्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर अर्ज घेणे बंद केले गेले. पुढील आदेशानंतरच प्रशासकीय पातळीवर अर्ज घेणे सुरू होणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून जेष्ठांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, कंबर बेल्ट आदी उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत होणार आहे.

योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या अर्जासोबत घोषणापत्र जोडावे लागणार आहे. यात कोणत्या कार्यक्षेत्रात राहतोय याचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र, तीन लाख रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला व वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे तसेच आधारकार्ड, बँक पासबुक, मेडिकल सर्टिफिकेट व रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शहर हद्दीत राहणाऱ्या ज्येष्ठांना संबंधित नगर पालिकेत व ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामपंचायतीत अथवा पंचायत समितीत अर्ज करावे लागणार आहेत.वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी अॅपवर अर्ज करता येणार आहेत.

या योजनेसाठी कोपरगाव नगरपालिका हद्दीत २ हजार १८० अर्ज प्राप्त झाले.त्यापैकी ३६४ अर्जदारांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत.८० जणांचे बँक अकाऊंट आधार कार्डशी अपडेट नव्हते,अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.