चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ४ लाख २२ हजार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले असून १ लाख ७९ हजार ८५२ शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.राज्य सरकारच्या विमा योजनेमुळे नगर जिल्ह्यातील रब्बीचे २ लाख २३ हजार ४९० हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र संरक्षीत झाले आहे.
दरम्यान,रब्बी पीक विमा उतरवण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असून शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा असून जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक मानले जाते.
मात्र,अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात चारा पिकांसह कांदा आणि उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.यासह हरभरा आणि गहू पिकाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात आहे.राज्य सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून त्यात मोठ्या संख्याने शेतकरी सहभागी होताना दिसत आहेत.
जिल्ह्यात चालू हंगामात १ लाख ७९ हजार ८५२ शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला आहे.यात ७ हजार ९१३ कर्जदार तर ४ लाख १४ हजार ३६४ बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.या शेतकऱ्यांनी २ लाख २३ हजार क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण घेतलेले आहे.
दरम्यान,हंगामातील पिक विमा काढण्याची मुदत दोन दिवसांनी १५ डिसेंबरला संपणार आहे.यापूर्वी विमा उतरवण्यास शिल्लक असणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा काढून घ्यावा,असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी, उन्हाळी कांदा, भूईमूग, गहू, हरभरा पिकांना विमा सरंक्षण असून यातील ज्वारी पिकाचा विमा काढण्याची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.
असे आहे रब्बी हंगाम पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलेले सहभाग – अकोले ७८४३,जामखेड१७७९३, कर्जत १२६०९, कोपरगाव ८०९१, नगर १०३३५, नेवासा १४३४४, पारनेर २५६९३, पाथर्डी १८०२३, राहाता ८९९१, राहुरी १५३४६, संगमनेर १९८३७, शेवगाव ७१३९, श्रीगोंदा ८६४६ आणि श्रीरामपूर ६५२५
फळबाग विमा योजनेत उतरवण्यात आलेल्या विमा क्षेत्रापैकी अनेक ठिकाणी फळबागा नसल्याचे तर काही ठिकाणी जादा क्षेत्र दाखवून विमा उतरवण्यात आल्याचे उघड झाले आहे.या योजनेत लाभार्थी हिस्स्यासह राज्य सरकारच्या वतीने विमा रक्कम भरण्यात येते.
राज्यात अनेक जिल्ह्यात बोगस फळबागा दाखवून विमा उतरवण्यात आला असल्याचे तपासणीत उघड झाले होते.या प्रकरणात अनेक शेतकऱ्यांनी लाभार्थी होण्यासाठी फॉर्म भरलेला असून बोगस विमा दाखवल्यामुळे आता शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा रकमेचा प्रश्न उभा राहत आहे.ही रक्कम शासन जप्त करणार की शेतकऱ्यांना परत देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.