पाथर्डी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजनेच्या ८ हजार ९५८ लाभार्थ्यांचे तीन महिन्यांचे २ कोटी ५० लाख ७६ हजार ८०० रुपये मानधन रखडले आहे.

अनुदान शिल्लक नसल्याने निराधारांना पैसे देता आले नाहीत परंतु आता अनुदान प्राप्त झाले आहे.लवकरच पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर देण्याचे काम करू,असे संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

पाथर्डी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे २ हजार ११४, श्रावणबाळ योजनेचे ४ हजार ६५९, इंदिरा गांधी निराधार योजनचे २ हजार १८५, एकूण असे ८ हजार ९५८ लाभार्थी आहेत.यामधील काही लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे तर काहींना तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही.

निराधारांना आधार देण्यासाठी कोणीही समोर यायला तयार नाही.सत्ताधारी व विरोधक असे दोन्हीही या विषयावर बोलत नाहीत.सामाजिक कार्यकर्त्यांच्या लेखी देखील हा विषय महत्त्वाचा वाटत नाही.याबाबत विचारणा करण्यात आली मात्र, अनुदान नसल्याने काही करू शकत नाहीत,असे उत्तर मिळाले.

संजय गांधी निराधारच्या २ हजार ११४ लाभार्थ्यांचे ९५ लाख १३ हजार एवढे पैसे थकलेले आहेत.इंदिरा गांधी योजनेच्या २ हजार १८५ लाभार्थ्यांचे ६ लाख ५५ हजार रुपये, तर श्रावणबाळ योजनेच्या ४ हजार ६५९ लाभार्थ्यांचे १ कोटी ३९ लाख ४५ हजार रुपये, असे तीनही वयोजनेच्या लाभार्थ्यांचे २ कोटी ५० लाख ७६ हजार ८०० रुपयांचे मानधन रखडले आहे.

केंद्र सरकारकडून श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारे प्रति लाभार्थी दोनशे रुपयांचे अनुदान,तर आठ महिन्यांपासून मिळालेले नाही.ही रक्कम नऊ लाख एकतीस हजार रुपये आहे.सरकारच्या मानधनावर अवलंबून असेलेल्या निराधारांना तीन ते चार महिन्यांपासून मानधन नाही.त्यामुळे त्यांना आता उसणवारीवर जीवन जगावे लागत आहे.

काही लाभार्थ्यांचे तीन महिन्यांचे,तर काहींचे दोन महिन्यांचे मानधन दिलेले नाही.अनुदान नसल्याने निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन देता आले नाही.आता अनुदान प्राप्त झाले आहे.बिले तयार केले आहेत.

बुधवारपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामधे मानधन मिळेल.केंद्र सरकारचे देखील अनुदान मिळाले आहे.ते पैसे लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जातील असे संजय गाधी निराधार योजना पाथर्डी कार्यालयाच्या ज्योती अकोलकर यांनी सांगितले आहे.

सरकारने आम्हाला तीन महिन्यांचे मानधन दिले नाही त्यामुळे मी वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत.राज्याच्या सचिवांनादेखील याबाबत मेल वरून तक्रार केली होती.निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडेही मानधन देण्याची मागणी केली होती.

त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे उत्तर दिले होते.महिन्याला मानधन देण्याचा नियम सरकारनेच तयार केला.त्याची पायमल्लीदेखील सरकारचे अधिकारीच करीत आहेत संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी परशुराम चव्हाण यांनी सांगितले.