Pm Mandhan Yojana : केंद्र शासन गरजू नागरिकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना सुरू करत असते. शेतकरी, शेतमजूर, महिला, कष्टकरी कामगार , विद्यार्थी इत्यादींसाठी केंद्र शासनाने आत्तापर्यंत शेकडो योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पीएम श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना शेतकरी तथा शेतमजुरांना पेन्शन देण्याचे प्रावधान आहे. या योजनेअंतर्गत मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या लोकांना पेन्शन दिली जाणार आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सुरुवातीला प्रीमियम भरावा लागणार आहे. योजनेत नाव नोंदणी केल्यानंतर 55 रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंतची प्रीमियमची रक्कम प्रति महिना भरावी लागणार आहे.
यानंतर मग वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सदर व्यक्तीला तीन हजार रुपये प्रति महिना एवढी पेन्शन दिली जाणार आहे. दरम्यान आज आपण या योजनेची पात्रता आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ कोणाला मिळणार
अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, पशुपालक शेतकरी, बांधकाम मजूर, स्थलांतरित मजूर, सफाई कामगार, विणकर, भाजी आणि फळ विक्रेता इत्यादी लोकांना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ मिळवता येणार आहे.
योजनेच्या पात्रता काय आहेत
अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. त्याचे वय 18 ते 40 वर्ष यादरम्यान असावे. अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असावा. सरकारी कर्मचारी तथा निमशासकीय कर्मचारी याचा लाभ घेऊ शकत नाही. मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या लोकांना याचा लाभ मिळणार नाही.
अर्ज कुठं करावा लागणार
पीएम मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा पुरावा यांसारखे महत्त्वाचे कागदपत्र जोडावे लागणार आहे.