महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार केले जात आहेत.१ जानेवारी ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील ३७ हजार ७० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.याचे ९३ कोटी २ लाख २९ हजार २७९ रुपये बिल शासनाने भरले आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आणि चालू योजनेची व्याप्ती वाढवली.त्यानुसार १ जुलै २०२४ पासून विस्तारित कार्यक्षेत्रासह एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेत महाराष्ट्रातील सर्व लोकसंख्या समाविष्ट आहे.ही योजना अंगीकृत रुग्णालयांद्वारे रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापासून ते घरी सुटी होईपर्यंत रोखरहीत दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करते.ही योजना पूर्णपणे हमी तत्त्वावर राबविण्यात येत आहे.
मागील ११ महिन्यांत जिल्ह्यातील ३७ हजार ७० रुग्णांवर उपचार केले आहेत.या सर्वांचे बिल शासनाने भरले आहे.जिल्ह्यात ७८ रुग्णालयातून या योजनेंतर्गत उपचार दिले जातात.आतापर्यंत शासनाने ११ महिन्यांतील ९३ कोटी २ लाख २९ हजार २७९ एवढी रक्कम भरली आहे.
मोफत उपचारासाठी पुढील प्रमाणे निकष आहेत.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (गट अ) साठी आयुष्मान कार्ड व वैध फोटो ओळखपत्र, महात्मा फुले योजना (गट अ) साठी आयुष्मान कार्ड किंवा शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय अन्नयोजना, अन्नपूर्णा, केशरी) व वैध फोटो ओळखपत्र, महात्मा फुले योजना (गट ब) साठी आयुष्मान कार्ड किवा शुभ्र शिधापत्रिका.
ती नसल्यास स्वयंघोषणापत्रासह अधिवास प्रमाणपत्र किंवा तहसीलदार प्रमाणपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र.महात्मा फुले योजना (गट क) साठी आयुष्मान कार्ड किंवा संबंधित संस्थेने निर्गमित केलेले वैध ओळखपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र, महात्मा फुले योजना (गट ड) साठी अपघातग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील जिओ टॅगिंग फोटो.
तसेच रस्ते अपघात झाल्याचे रुग्णालयाने पोलिसांना कळविल्याचे पत्र, तसेच रुग्णाचा आधारकार्ड किंवा मतदार कार्ड किंवा पॅनकार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही फोटो ओळखपत्र.याबरोबरच महात्मा फुले योजना (गट ड) साठी कर्नाटक शासनातील समक्ष प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेली अंत्योदय अन्न योजना (AAY) शिधापत्रिका, प्राधान्य गट (PHH) शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका, विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आणि वैध फोटो ओळखपत्र आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी रेशनकार्ड व आधार कार्ड अधिकृत रुग्णालयातील आरोग्यमित्रांकडे द्यावे.कोणत्याही तक्रारीसाठी १५५३८८ या क्रमांकावर संपर्क करा.तुम्हाला काही अडचण आल्यास अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र व टोल फ्री क्रमांक १५५३८८ / १८००२३३२२०० यावर संपर्क साधावा लागणार आहे.