अवेळी जेवण, बेकरी प्रॉडक्टचे सेवन,रात्री उशिरापर्यंत केलेल्या जागरणाचा परिणाम आरोग्यावर दिसू लागला असून, अपेंडिक्सचे म्हणजेच पोटाचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे.यामुळे अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया वाढल्या आहेत.

विविध कारणांमुळे अलीकडच्या काळात अपेंडिक्सचे रुग्ण वाढत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे.बाहेरचे, उघड्यावरचे अन्न, तळलेले व तेलकट पदार्थ खाण्याने पोटाच्या पचनक्रियेवर परिणाम होत आहे.यामुळेही रुग्ण वाढल्याचे चित्र दिसते आणि त्यावर उपचार होणे आवश्यक आहे.

उपचारास विलंब झाला तर अपेंडिक्स पोटात फुटून संसर्गाचा धोका निर्माण होतो.अपेंडिक्स ही एक पातळ नळी असते, जी मोठ्या आतड्याला जोडलेली असते.ती पोटाच्या खालच्या उजव्या भागात बसते.अपेंडिक्स रोगप्रतिकारक शक्तीचा एक कार्यरत भाग आहे.रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला रोगाशी लढण्यास मदत करते.

कामाबरोबरच पार्टीच्या निमित्ताने रात्रीचे जागरण करणे टाळावे.रात्रीची ड्यूटी असेल तर दिवसा जास्त वेळ पुरेशी झोप घ्यावी.ज्यामुळे शरीराला पुरेसा आराम मिळेल.सर्दी, खोकला, हात, पायदुखीची औषधे नेहमीच घेऊ नयेत.ते टाळण्याचा प्रयत्न करावा.

सर्व वयोगटांमध्ये अपेंडिक्स होण्याचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.खासगी व सरकारी रुग्णालयांमध्येही रुग्णांची उपचारासाठी दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

अपेंडिक्सचा त्रास सुरु झाल्यावर पोटाच्या बाजुला वेदना होऊन ताप येतो.उलटीचीही लक्षणे अपेंडिक्सचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात.लक्षणे जाणवत असली तरी तत्काळ डॉक्टरांना दाखवून उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.

अपेंडिक्सच्या तोंडाशी अन्न घटक अडकला असेल तर चयापचयाची क्रिया मंदावते.यामुळे अपेंडिक्सवर सूज येते. अपेंडिक्सचा त्रास जाणवत असल्यास तिखट व तळलेले पदार्थ खाणे टाळावे.त्यातच जास्त तिखट पदार्थ सेवन करणे, बाहेरचे तळलेले पदार्थ खाऊ नये,असा सल्ला डॉक्टर देतात.

शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये अपेंडिक्सवर उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.शस्त्रक्रियेतील गुंतागुंत कमी करायची असेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे उपयुक्त ठरते.

पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रात्रीचे जागरण, तेलकट आणि तिखट खाणे टाळावे. अपेंडिक्सची लक्षणे जाणवल्यास जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी.आजार अंगावर काढू नये.