हिवाळा हा सर्व अर्थाने सुप्त ऋतू असून, तो आरोग्यासाठी चांगला समजला जातो. मात्र,या काळात आरोग्यविषयक काही तक्रारी उद्भवतात.गेल्या काही दिवसांमध्ये सर्दी, खोकला, घशात खवखव, तसेच कान दुखण्याचादेखील त्रास होत असल्याचे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांनी सांगितले.
यात सर्वच वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे.कान दुखण्याचा त्रास विविध कारणांनी होतो.त्यामुळे नेमके निदान होणे गरजेचे आहे.असे संगमनेरातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर निकुंज दातीर यांनी सांगितले.
सर्दी आणि फ्लूच्या हंगामात कानाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. सर्दी, खोकला आणि त्याबरोबरच इतरही त्रास होतात.व्हायरस आणि बॅक्टेरिया यामुळे कानाला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
कानात मळ साचल्यानेसुद्धा कान दुखण्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कानात काही गेल्यानंतरसुद्धा तो दुखतो.दात किडणे, टॉन्सिल यामुळेही वेदना होऊ शकतात.
त्यामुळे नेमके कारण शोधून तज्ज्ञ डॉक्टर उपचार करतात.कान, नाक आणि घसा हे एकमेकांशी जोडलेले शरीराचे असे अवयव आहेत की जे आपल्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने त्यांना थंडीत, तसेच इतरही ऋतूत सर्दी, खोकला होऊन ताप येतो. त्यावेळी त्यांना कान दुखण्याचा त्रासदेखील होऊ शकतो.
अनेकदा लहान मुले कानात कुठली तरी वस्तू, डाळ, शेंगदाणे, आदी घालतात.त्यामुळेही त्यांचा कान दुखतो,अशावेळी कान दुखण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला गरजेचा ठरतो.
कान हा असा अवयव आहे की, ज्याचे बाह्य, मधला आणि आतील असे तीन भाग असतात.कान दुखणे, कानात आवाज येणे, श्रवण कमी होणे, काहीही ऐकायला न येणे, कानातून स्राव येणे, कानात खाज सुटणे, चक्कर येणे, आदी बाबी या कानाचे आजार याबाबत निगडित आहेत.तसेच गालफुगी,कांजिण्या या विषाणूजन्य आजारांमुळे सुद्धा श्रवणदोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुठलाही त्रास होत असताना डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, त्यांनी लिहून दिलेली औषधी, गोळ्या घ्याव्यात.मनानेच कुठलीही औषधी गोळ्या घेऊन नयेत. कान दुखत असल्यास ईअरबडचा वापर टाळा. कानाच्या दुखण्याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका.
कानाच्या कोणत्याही समस्येसाठी तज्ज्ञ डॉक्टरांना भेटावे,कानात तेल टाकू नये.कानात ईयरबड घालू नयेत.अंघोळ झाल्यानंतर कान योग्य पद्धतीने स्वच्छ करावेत.थंडीत काळजी घ्यावी,कानटोपी घालावी.