तीस हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र याप्रमाणे २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यासाठी १५० हून अधिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे.सध्या जिल्ह्यात १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून,नवीन १९ केंद्रांना मंजुरी मिळाली, तर २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहेत.
मंजुरी मिळालेले आणि प्रस्तावित अशी ४२ केंद्र सुरू झाल्यास ग्रामीण भागातील आरोग्यस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.जिल्हा नियोजन विभागाकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी २०२४-२५ वर्षासाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
हा निधी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांची इमारत दुरुस्ती,नवीन बांधकाम यासह इतर सुविधांसाठी खर्च केला जातो. याशिवाय राज्य सरकार, १५व्या वित्त आयोग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जिल्हा आरोग्य विभागाला निधी दिला जातो.
जिल्ह्यात १९ नवीन प्राथमिक केंद्र मंजूर झाली आहेत.यातील १० केंद्रांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून,पदनिर्मितीचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून,चार केंद्रांच्या इमारतींसाठी अद्याप जागा उपलब्ध झालेली नाही.
राज्य सरकारची मंजुरी मिळूनही दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना दहा वर्षांनंतरही जागा उपलब्ध झाली नाही.यामध्ये २०१४ मध्ये मंजुरी मिळालेले राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ व अकोले तालुक्यातील पांजरे येथील केंद्र आहेत.
नोव्हेंबर २०२१मध्ये पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व २०२४ मध्ये कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथे नवीन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.या दोन केंद्रांनाही जागेचा शोध सुरूच आहे.
सन २०१९ मध्ये अकोले तालुक्यातील आंबड व पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी, २०२१ साली कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख, नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व २०२४मध्ये कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.
सन २०१४ मध्ये मंजुरी मिळालेले अकोले तालुक्यातील सुगांव व पांजरे, जामखेड तालुक्यातील सोनेगाव व शिरुर, कर्जत येथील कोंभळी, राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ व सात्रळ,राहुरी येथील म्हैसगाव, संगमनेर तालुक्यातील खांबे,पेमगिरी, जोर्वे, कौठे कमळेश्वर आणि श्रीगोंदा येथील देवदैठण प्राथमिक केंद्र १० वर्षा नंतरही सुरू झालेली नाहीत.
सन २०११ च्या जनगणनेनुसार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत.शासनाच्या मंजुरीनुसार आरोग्य केंद्राचे काम सुरू आहेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले आहे.