Lagn Muhurt 2025 : नोव्हेंबरमध्ये तुळशीच्या लग्नानंतर म्हणजे १८ नोव्हेंबरपासून सुरू झालेली लग्नसराई आता थेट फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. मार्च महिना सोडला तर पुन्हा एप्रिल ते जून असे तीन महिने सलग लग्नाचे मुहूर्त आहेत. विधानसभा निवडणूक संपली आणि आता लग्नसराईचा उत्सव गावोगावी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दिवाळी झाली, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये अनेकजण व्यस्त होते. त्यात तुळशीचे लग्न झाल्यानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात. १५ नोव्हेंबरपर्यंत तुळशीचे विवाह होते. १८ नोव्हेंबरपासून मुहूर्ताना सुरुवात झाली असली तरी मतदान आणि निकालानंतरच्याच मुहूर्तावर अनेकांनी भर दिला होता. त्यानुसार गत आठवड्यापासून लग्नसराईला सुरुवात झाली आहे.

लग्नसराईमुळे पुन्हा एकदा बाजार फुलला आहे. कपडे, सोने खरेदीसाठी गर्दी होत आहे. मंडप, केटरर्स, मंगल कार्यालयांचेही बुकिंग झालेले आहे. बसेस, ट्रॅव्हल्सनाही गर्दी वाढली आहे. जिल्ह्यातील मंगल कार्यालये, लॉन, सभागृो, मोकळ्या मैदानांवर विवाह सोहळे पार पडत आहेत. पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या विवाहसोहळ्यांना मोठी गर्दी वाढत असल्याचे दिसते आहे.

असे आहेत विवाह मुहूर्त
डिसेंबर २०२४ : ३, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २३
जानेवारी २०२५ : १६, १७, १८, १९, २०, २१, २३, २४, २६, २७
फेब्रुवारी २०२५ : २, ३, ६, ७, १२, १३, १४, १५, १८, १९, २१, २३, २५
एप्रिल २०२५ : १४, १६, १८, १९, २०, २१, २५, २९, २०
मे २०२५ : १, ५, ६, ८, १०, १४, १५, १६, १७, १८, २२, २३, २४, २७, २८
जून २०२५ : २, ४, ५, ७, ८

या काळात नाही लग्नमुहूर्त
पंचांगात नमूद केल्याप्रमाणे जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ या महिन्यांमध्ये लग्नमुहूर्त देण्यात आलेले नाहीत. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार मुहूर्त काढले जातात. या काळात ही स्थिती योग्य नसल्याचे पंचागकर्त्यांनी नमूद केले आहे.

मंगल कार्यालये हाऊसफुल्ल ! बुकिंगसाठी धावपळ
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यांत लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त आहेत. मात्र सुट्ट्यांचे नियोजन पाहून लोक लग्नाचा मुहूर्त काढतात. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे महिन्यांत सर्वाधिक लग्ने होतात. लग्नामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील मंगल कार्यालये, लॉन्स, सभागृहांचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. याशिवाय मंडप, बॅण्ड, केटरर्स, इव्हेंट यांच्या तारखा बुक झाल्या आहेत. जानेवारीपर्यंत अनेक मंगल कार्यालये बुक झाली आहेत. त्यानंतरच्या लग्नकार्यासाठी आता पालकवर्ग बुकिंगसाठी धावपळ करत आहे.