Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गांचे कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा असून आत्तापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे पूर्ण झालेला मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू देखील करण्यात आला आहे. उर्वरित 76 किलोमीटरच्या मार्गाचे देखील लवकरात लवकर काम पूर्ण करून तो सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. जुलै 2024 पर्यंत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी आशा आहे. याशिवाय नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला देखील राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली असून याची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे.
या महामार्गाच्या भूसंपादनाला देखील सुरुवात झाली आहे. विशेष बाब अशी की, शक्तीपीठ महामार्ग हा 805 किलोमीटर लांबीचा असेल आणि हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महाराष्ट्रात आणखी एक नवीन महामार्ग विकसित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळाने याचा प्रस्ताव देखील तयार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण ते लातूर दरम्यान हा नवीन महामार्ग विकसित होणार आहे. या महामार्गामुळे कल्याण ते लातूर हा प्रवास जलद होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
10 तासाचा प्रवास होणार फक्त 4 तासात
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला कल्याण ते लातूर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना दहा तासांचा कालावधी खर्च करावा लागतो. हेच कारण आहे की राज्य रस्ते विकास महामंडळाने या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास जलद व्हावा यासाठी कल्याण ते लातूर दरम्यान नवीन महामार्ग बांधणे प्रस्तावित केले आहे. अर्थातच कोकण आणि मराठवाडा हे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे विभाग हा महामार्ग जोडणार आहे. सध्या स्थितीला या दोन्ही शहरा दरम्यान 450 km चे अंतर आहे. मात्र नवीन महामार्गामुळे हे प्रवासाचे अंतर कमी होईल आणि हा प्रवास जलद होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
कसा राहणार मार्ग
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा मार्ग कल्याण येथून सुरू होईल. पुढे हा मार्ग माळशेज घाटात प्रवेश करणार आहे. माळशेज घाटात या प्रकल्प अंतर्गत तब्बल 8 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाणार आहे. या बोगद्याने मग पुढे अहमदनगरला जाता येणार आहे. अहमदनगरमार्गे पुढे बीड, मांजरसूंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत हा महामार्ग संपणार आहे.
प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी पाठवणार
या महामार्गासाठी 50 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र हा एक अंदाज आहे. जेव्हा या महामार्गाचा डीपीआर आणि संरेखन अंतिम होईल तेव्हा या प्रकल्पासाठी किती खर्च लागू शकतो याचा निश्चित आकडा समोर येणार आहे. तथापि, या महामार्गाचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाने रेडी केला असून लवकरच हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर मग या महामार्गाचे पुढील काम सुरू होणार आहे.