गोदावरी कालव्याच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी २०२४-२५ रब्बी हंगामासाठी पाटबंधारे विभागामार्फ़त जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले असून रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी पाटबंधारे विभागामार्फत डाव्या उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर आवर्तन देण्याचे जाहीर झाले आहे.

त्यामुळे १४ नोव्हेंबर पर्यंत पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी गोदावरी कालवा परिसरातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना मुदत दिली होती.पण हि मुदत संपल्यामुळे काही लाभार्थी शेतकऱ्यांना मात्र आपले अर्ज मुदतीच्या आत दाखल करता आले नाहीत.

त्यामुळे ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले नाही त्या शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून आ. काळे यांनी पाटबंधारे विभागाला ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यामुळे पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांचे रब्बी हंगाम २०२४-२५ साठी ७ नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ केली आहे.त्यामुळे आता लाभार्थी शेतकरी ५ डिसेंबर पर्यंत पाणी मागणी अर्ज करू शकतील.

त्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज लवकरात लवकर दाखल करावे आणि योजनेचा फायदा घ्यावा ,असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.