13 मार्च 2024 रोजी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीने 26 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
दरम्यान आजच्या या महत्त्वाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या 26 महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अहमदनगर शहराचे आणि जिल्ह्याचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्याच्या महत्त्वाच्या अशा निर्णयाचा देखील समावेश आहे. याशिवाय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे देखील नामकरण करण्यात आले आहे. वेल्हे तालुक्याला राजगड असे नवीन नाव देण्यात आले आहे. वेल्हे तालुक्याला मिळालेले हे नवीन राजगड नाव तालुक्यातील राजगड या किल्ल्यावरून देण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने नामकरणाचे हे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे बोलले जात आहे. आता आपण अहमदनगर शहराला अहमदनगर हे नाव कसे पडले आणि ज्या मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने अहमदनगरला अहिल्यानगर असे नवीन नाव देण्यात आले आहे त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा रंजक इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अहमदनगर हे नाव कसे पडले ?
असं म्हटले जात की, अहमदनगर शहराचे नाव अहमद निजामशाहच्या नावावर पडले होते. 15 व्या शतकात निजामशाहने अहमदनगरची स्थापना केली होती. तेव्हापासून अहमदनगर शहराचे नाव बदलण्यात आले नव्हते. पण आता शिंदे सरकारने अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच केली होती घोषणा
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मराठा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती दिनानिमित्त राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी अर्थातच चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात अहमदनगरचे नाव बदलण्याचा मानस बोलून दाखवला होता. नुकत्याच काही दिवसांपूर्वी, अहमदनगर महापालिकेने देखील प्रस्तावित नाव बदलाला मान्यता देणारा ठराव मंजूर केला. खरे तर अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या नामांतराची मागणी करताना आणि महापालिकेने ठराव करताना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” असे नाव सुचवले होते. पण राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेताना साधेसोपे नाव असावे म्हणून ‘अहिल्यानगर’ असे नामकरण केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
कोण होत्या अहिल्याबाई होळकर ?
अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी अर्थातच मल्हारपीठ गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौंडी गावचे पाटील होते. अहिल्यादेवी होळकरांना त्यांच्या वडिलांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण मिळाले होते. त्यावेळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नव्हते. मात्र तरीही माणकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला अर्थातच अहिल्यादेवी यांना लिहिण्या-वाचण्यास शिकवले हे विशेष. असं म्हणतात की, पेशवे बाजीरावांचे सेनापती मल्हारराव होळकर हे एकदा पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. त्यावेळी मल्हाररावांनी आठ वर्षाच्या अहिल्यादेवींना एका मंदिरात पाहिले. त्यांना मुलगी पसंत पडली आणि त्यांनी आपल्या मुलाची म्हणजे खंडेराव याची वधू म्हणून घरी आणले.
मंदिरात सेवा करताना आठ वर्षांच्या अहिल्यादेवीची भक्ती आणि चारित्र्य मल्हाररावांना खूपच आवडले होते. अहिल्यादेवीची भक्ती आणि चारित्र्य पाहून मल्हाररावांनी मुलगा खंडेराव आणि अहिल्यादेवीचा विवाह लावून दिला. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडलेत. पतीच्या निधनानंतर अहिल्यादेवींनी माळव्याचा ताबा घेतला. त्या त्यांच्या सासऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय आणि लष्करी रणनीतींमध्ये उत्कृष्ट बनल्यात.
खंडेरावांच्या निधनानंतर सती प्रथेचे पालन करण्याऐवजी तिला आपल्या लोकांचे नेतृत्व करण्यास मल्हारराव होळकर यांनी प्रोत्साहित केले होते. पण, काही वर्षांनंतर त्यांच्या सासऱ्याचे अर्थातच मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला. यानंतर माळव्याचा कारभार अहिल्यादेवी स्वतः पाहू लागल्या. लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. अहिल्यादेवींनी अनेक हिंदू मंदिरे, नदीघाट बांधलीत. याशिवाय त्यांनी त्यावेळी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण देखील अवलंबलं होतं. अहिल्यादेवी होळकर उचित न्यायदानासाठी विशेष ओळखल्या जात.