Ahmednagar News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रामभक्त महाबली हनुमानाची पूजा केली जाते. सर्वच गावांमध्ये पवनपुत्र हनुमानाचे मंदिर पाहायला मिळते. देशभरातील भाविक हनुमानाची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. जो कोणी भाविक श्रद्धेने हनुमानाची पूजा करतो त्याची सर्व मनोकामना पूर्ण होत असते. प्रत्येक गावात हनुमंताचे मंदिर असते आणि दररोज हनुमान मंदिरात ग्रामस्थांची गर्दी होत असते. हनुमानाची पूजा अर्चना होत असते.
तुमच्याही गावात अंजनी पुत्र हनुमंताचे मंदिर असणारच. कारण की, हनुमंताला प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल, असा आशीर्वाद प्रभू राम यांनी दिलेला आहे. हनुमान यांची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या प्रभू श्रीरामांनी हा आशीर्वाद त्यांना दिला आहे.
मात्र महाराष्ट्रात असेही एक गाव आहे जिथे हनुमान मंदिर नाहीये, येथे हनुमंताचे साधे नावही घेतले जात नाही. तसेच, या गावात देवांची नाही तर दैत्यांची आराधना केली जाते. विशेष बाब अशी की, हे प्रभू श्री राम यांच्या वरदानामुळेच झालेले आहे.
तुम्हाला कदाचित हे खरे वाटणार नाही पण आपल्या राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात असे एक गाव आहे. या गावाला दैत्यनांदूर म्हणून ओळखतात. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात हे गाव वसलेले आहे. दैत्यांची आराधना केली जाणारे हे गाव कदाचित संपूर्ण भारतातील एकमेव गाव असेल.
दैत्यनांदूर गावात निंबादैत्य महाराजांची यात्रा भरते
दैत्यनांदूर गावाचे ग्रामदैवत श्री निंबादैत्य आहेत आणि श्री निंबादैत्य महाराजांचे येथे भव्य मंदिरही आहे. या मंदिरात दररोज येथील ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळते आणि येथील गावकरी दैत्य महाराजाची पूजा करतात. विशेष म्हणजे निंबादैत्य महाराजांचा या गावात भव्य असा यात्रोत्सव देखील भरतो. गुढीपाडव्याला आणि पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या गावात निंबादैत्य महाराजांची यात्रा भरते.
काल गुढीपाडव्याच्या पर्वावर या गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात यात्रा भरली. आज देखील या गावात ही यात्रा होती. आज या यात्रेचा शेवटचा दिवस होता. अशा परिस्थितीत, आज आपण पाडव्याच्या मुहूर्तावर निंबादैत्य महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने दैत्यनांदूर गावात भरलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर या गावातील इतिहास नेमका काय आहे हे समजून घेणार आहोत.
रामायण काळाच्या इतिहासामुळे निंबादैत्य महाराजांची पूजा होते
या गावात हनुमंताचे मंदिर तर नाहीच शिवाय या गावात रामभक्त हनुमानाचे नाव देखील घेतले जाऊ शकत नाही. ग्रामस्थ सांगतात की, गावात जर समजा एखाद्याने हनुमंताचे नाव घेतले तर त्याला विचित्र अनुभव येतो. मात्र जर निंबादैत्य महाराजांची मनोभावे पूजा केली आणि नवस मागितला तर दैत्य महाराज नवसाला पावतात.
येथील गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशी आख्यायिका आहे की, रामायण काळात रामभक्त हनुमान आणि निंबादैत्य यांच्यात युद्ध झाले होते. यात हनुमान आणि निंबादैत्य दोघेही मोठे जखमी झालेत. यावेळी निंबादैत्य यांनी प्रभू श्रीरामांची धाव घेतली. विशेष म्हणजे मनोभावाने प्रभू श्रीरामांना निंबादैत्य यांनी हाक दिल्याने प्रभू श्रीराम निंबादैत्य महाराजांना पावतात आणि त्यांना एक वरदान मिळाले आहे.
त्यावेळी या गावात निंबादैत्य यांचेच नाव निघेल आणि त्यांचे मंदिरही बांधले जाईल असे वरदान प्रभू राम यांनी दिले. यानुसार या गावात निंबादैत्य महाराजांचे भव्य मंदिर बांधले गेले आहे आणि त्यांचेच नाव घेतले जाते. त्यांची यात्रा सुद्धा भरते. रामायण काळापासून या गावात दैत्य महाराजांची पूजा होत आहे आणि आजही दैत्य महाराजांची या गावात पूजा होते.
गावकरी हनुमानाच्या नावाने मुलांची नाव सुद्धा ठेवत नाहीत
या गावात हनुमंताचे नाव तर निघतचा नाही, शिवाय येथील गावकरी आपल्या मुलांचे नाव देखील हनुमंतांवरून ठेवत नाहीत. दुसरीकडे, घर, दुकान यावर निंबादैत्य महाराजांचे नाव आहे आणि त्यांचा फोटो देखील प्रत्येक घरात पाहायला मिळतो.