Havaman Andaj 2024 : गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रात देखील गेल्या महिन्यात वादळी पावसाचे सावट पाहायला मिळाले होते. या चालू महिन्यातही अर्थातच एप्रिल महिन्यातही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थोडासा दिलासा नक्कीच मिळाला आहे. पण अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक ऐन काढणीच्या अवस्थेतच या पावसामुळे वाया गेले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहे.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील कांदा पिक तथा विदर्भ आणि मराठवाडा विभागातील हरभरा, हळद अशा मुख्य पिकांना या अवकाळीचा चांगला फटका बसला आहे. या वादळी पावसामुळे फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत.
अशातच हवामान खात्याने या चालू आठवड्याची एंडिंग देखील अवकाळी पावसाने होणार असे नुकतेच जाहीर केले आहे. अर्थातच या चालू आठवड्याची सुरुवात वादळी पावसानेच झाली आणि आता या आठवड्याची एंडिंग देखील अवकाळी पावसानेच होणार आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, सौराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागात गेल्या चार दिवसांपासून पावसाचे सत्र सुरू आहे.
तसेच आज आणि उद्या देखील पावसाची शक्यता आहे. आयएमडीने म्हटल्याप्रमाणे राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे उद्या अर्थातच 14 एप्रिल 2024 ला राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आयएमडीकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील या संबंधित सात जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय उद्या लातूर, नांदेड आणि हिंगोली या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील वादळी पावसातच साजरी करावी लागणार असे चित्र तयार होत आहे.
दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या देखील अवकाळी पावसाची शक्यता असल्याने तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकार लोकांनी केले आहे.