Maharashtra Jamin Kayda : देवस्थानाची जमीन आणि गायरान जमीन याबाबत सर्वसामान्यांमध्ये नेहमीच संभ्रमावस्था पाहायला मिळते. खरे तर, गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात गायरान जमिनीचा मुद्दा हा खूपच चर्चेत आला होता. गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाल्यानंतर गायरान जमिनी विषयी वेगवेगळे प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जाऊ लागलेत.
गायरान जमीन म्हणजे काय, गायरान जमीन नावावर होऊ शकते का? देवस्थानाच्या जमिनीबाबत देखील असेच प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित होऊ लागलेत. यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देवस्थानाची जमीन आणि गायरान जमीन नावावर होऊ शकते का? दरम्यान आज आपण याबाबत महाराष्ट्र जमीन कायद्यात कोणती तरतूद आहे ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
देवस्थानाची जमीन म्हणजे कोणती जमीन?
आधी हिंदू, मुस्लिम तथा इतर धर्माच्या देवस्थानांसाठी जमिनी दिल्या जात असत. या जमिनी राजा-महाराजांकडून तथा शासनाकडून बक्षीस म्हणून दिल्या जात असत. आजही शासनाच्या माध्यमातून देवस्थानांना जमिनी दिल्या जातात. या जमिनी बक्षीस स्वरूपात देवस्थानांना दिल्या जातात. अशा जमिनींना देवस्थानाची जमीन म्हणून ओळखले जाते.
देवस्थानाची जमीन नावावर होते का ?
अशी जमीन ही वर्ग 3 मधील असते. या जमिनीच्या सातबारावर संबंधित देवाचे नाव मालक म्हणून किंवा कब्जेदार म्हणून लावलेले असते. दरम्यान अशा जमिनीचे हस्तांतरण, विक्री किंवा वाटप होऊ शकत नाही. पण काही अपवादात्मक परिस्थितीत शासनाच्या पूर्वपरवानगीने आणि धर्मादाय आयुक्त या दोघांच्या परवानगीने या जमिनीचे हस्तांतरण किंवा विक्री होऊ शकते. म्हणजेच कायद्यात अशा जमिनी हस्तांतरित करण्यासाठी शासनाची आणि धर्मादाय आयुक्त यांची परवानगी बंधनकारक आहे.
गायरान जमीन म्हणजे काय ?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गायरान जमिनीचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 12 मध्ये स्पष्ट उल्लेख आढळतो. या कायद्यानुसार गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी, वनासाठी, राखीव जळणासाठी, गावातील गुराढोरांकरिता मोफत कुरणासाठी, राखीव गवतासाठी, वैरणीसाठी, दहनभूमीसाठी किंवा दफनभूमीसाठी, गावठाणासाठी, छावणीसाठी, मळणीसाठी, बाजारासाठी, कातडी कमवण्यासाठी, रस्ते, बोळ, उद्याने, गटारे, यांसारख्या कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी वेगळ्या ठेवल्या जातात.
यातील मोफत कुरणासाठी, गवतासाठी किंवा वैरणीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जमिनीला गायरान जमीन अस संबोधलं गेलं आहे. तज्ञ सांगतात की, एखाद्या गावाच्या अवतीभोवती असलेल्या सार्वजनिक वापराकरिता ग्रामपंचायत किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात असलेली जमीन ही गायरान जमीन म्हणून ओळखली जात असते. अशा जमिनीचा ताबा हा ग्रामपंचायतीकडे किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असतो. पण, याचा मालक हा शासन असतो.
गायरान जमीन नावावर होते का ?
गायराण जमीन ही ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात जरूर असते. मात्र या जमिनीचे मालक शासन स्वतः असते. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शासन असाच उल्लेख असतो. यामुळे ही जमीन कोणत्याच खाजगी व्यक्तीच्या नावावर होऊ शकत नाही. या जमिनीच्या वापराकरिता तसेच हस्तांतरण करण्याकरिता संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. मात्र अशी जमीन कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही.