Monsoon 2024 News
Monsoon 2024 News

Monsoon 2024 News : गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. शेतकरी राजा अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहे. उकाड्याने हैराण जनता मान्सूनचे आगमन कधी होणार ? हाच प्रश्न उपस्थित करत आहे. दरम्यान मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय हवामान खात्याचा मान्सून 2024 संदर्भातील हवामान अंदाज खरा ठरला आहे.

मान्सूनचे आज अर्थातच 19 मेला अंदमानात आगमन झाले आहे. मान्सून अंदमानात पोहोचल्याचे भारतीय हवामान खात्याने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळणार आहे. तथापि मानसून अंदमानात पोहोचला असल्याने आता शेतकऱ्यांना अधिक ताकतीने शेतीची कामे करावी लागणार आहेत. कारण की महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सून आगमन होणार आहे.

महाराष्ट्रात कधी आगमन होणार

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दरवर्षी अंदमानात मान्सूनचे 21-22 मे च्या सुमारास आगमन होत असते. यंदा मात्र 19 मे ला मान्सून अंदमानातं पोहोचला आहे. यामुळे यंदा केरळात देखील मान्सूनचे लवकर आगमन होणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यंदा केरळात मान्सूनचे 31 मे ला आगमन होण्याची शक्यता आहे.

आता येत्या अकरा दिवसांनी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर दरवर्षी राज्यात सात जूनच्या सुमारास मान्सून आगमन होत असते. सुरुवातीला राज्यात मान्सून तळ कोकणात दाखल होत असतो. यानंतर 10 ते 11 जूनच्या सुमारास मान्सून मुंबईमध्ये पोहोचतो.

15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो. यंदा देखील मान्सूनचे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगमन होऊ शकते असा अंदाज आहे. आज अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचला आहे.

मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमानमध्ये पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान मान्सूनची अशीच प्रगती कायम राहिली तर 31 मे अखेरपर्यंत मान्सून केरळात येणार आहे. यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील शेतीची पूर्व मशागतीची कामे जलद गतीने पूर्ण करावी लागणार आहेत. खते, बी बियाणे यांचा साठा देखील शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.

या भागात कोसळणार पूर्व मौसमी पाऊस

दुसरीकडे हवामान खात्याने आज आणि उद्या केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागात पूर्व मौसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिला आहे.

या पार्श्वभूमीवर या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मेघालय मध्ये देखील आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. केरळमध्ये 21 आणि 22 मे ला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.