Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी तुफान गारपीट देखील होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक ऐन काढणीच्या वेळीच वाया गेले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवस महाराष्ट्रात अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज दिला आहे.
हवामान खात्याने आज अर्थातच 14 एप्रिल 2024 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी देखील महाराष्ट्रात पावसाचेच सावट पाहायला मिळणार असा अंदाज दिला आहे. येत्या दोन दिवसांनी मात्र वादळी पावसाचे वातावरण निवळणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र असेच सुरू राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आणखी चार दिवस अर्थातच 18 एप्रिल 2024 पर्यंत वादळी पाऊस सुरू राहणार असे डख यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी काढणी केलेला शेतमाल योग्य पद्धतीने झाकून ठेवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष बाब अशी की या कालावधीत काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते यामुळे पशुधनाची देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मुक्काम आता आणखी वाढला आहे हे स्पष्ट होत आहे. निश्चितच जर पंजाब रावांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून कसा राहणार ?
महाराष्ट्रात सध्या ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. यामुळे यंदाचा मान्सून कसा राहणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान अमेरिकन हवामान विभागाने आणि स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यावर्षी एलनिनोचे सावट राहणार नाही तर ला निना सक्रिय राहणार असे सांगितले आहे.
स्कायमेटने म्हटल्याप्रमाणे यंदा इंडियन ओशियन डायपोल अर्थातच आयओडी देखील पॉझिटिव्ह राहणार आहे. यामुळे यंदाच्या मान्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत चांगला समाधानकारक पाऊस होईल अशी शक्यता आहे. यंदा सामान्य मान्सून राहील असे स्कायमेटने स्पष्ट केले असून सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.