महापालिका अतिक्रमण विभागाने सोमवारी स्टेशन रोड, कोठला परिसरातील अतिक्रमणे हटविली. मंगळवारी (दि. १७) लालटाकी येथील शाहीर अण्णा भाऊ साठे चौकातील रस्त्यावरील अतिक्रमित पक्के शेड हटविली.येत्या काही दिवसांत अतिक्रमण हटाव मोहीम आणखी तीव्र होणार असून, ‘दादा’, ‘भाऊ’ची पक्की बांधकामे जमीनदोस्त होणार असल्याचे समजते.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शहरातील अतिक्रमणे हटविण्याबाबत गेल्या आठवड्यात बैठक घेऊन इशारा दिला होता.त्यानुसार सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्टेशन रस्त्यावरील स्वस्तिक चौक ते मार्केट यार्ड चौक, माळीवाडा परिसर वाडिया पार्क परिसरातील अतिक्रमणे हटविली.स्टेशन रस्त्यावरील कोठला परिसरातील अतिक्रमणे हटविली.
फुटपाथवरील पक्की बांधकामे,पानटपरी, चहाची टपरी, पावभाजी, वडापावची दुकाने काढून टाकली. त्यामुळे स्टेशन रस्त्यावर उड्डाणपुलाखाली रस्त्याने मोकळा श्वास घेतला.दरम्यान,महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने लालटाकी रस्त्यावरील शाहीर अण्णा भाऊ साठे चौकातील रस्त्यावरील अतिक्रमित पक्की बांधकामे, शेड हटविली.
त्या सुमारे सात ते आठ पक्की बांधकामे होती.आज दिवसभर अतिक्रमण विभागाचे पथकाने जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे हटविली.सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत असून, मोहिमेत सातत्य राहणार आहे.
शहरातील कापड बाजार, तेलीखुंट, मोचीगल्ली, घासगल्ली, नवी पेठ आदी ठिकाणी पार्किंग पॉलिसी ठरविण्यात आली असून, याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. याबाबत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरातील इतर ठिकाणचे अतिक्रमणे काढल्यानंतर कापड बाजार परिसरातील अतिक्रमणही काढले जाणार आहे.
शहरात काही अनधिकृत बांधकामे आहेत.त्यांचे मोजमाप करण्यात येईल.मालमत्ता धारकांना नियमाप्रमाणे नोटिसा दिल्या जातील.त्यानंतर अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम कोणाच्याही दबावाला बळी न पडता काढून टाकण्यात येईल असे महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.