महापालिकेने शहरातील अतिक्रमणांवर सुरू केलेली कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमण धारकांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देत अतिक्रमणे स्वतः हून काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.सोमवार पासून शहराच्या सर्व भागात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले.
दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा ते चितळे रोड, नेता सुभाष चौक, कापड बाजार, मोची गल्ली, बालिकाश्रम रोड, उपनगरातील एकवीरा चौक प्रोफेसर चौक, भिस्ताबग चौक, सक्कर चौक, मार्केट यार्ड परिसर, बोल्हेगाव,केडगाव, लिंक रोड
अंबिका नगर बसस्टॉप, कोठला स्टँड परिसर, झेंडीगेट, मुकुंदनगर, अकबरनगर या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले.तसेच, जिल्हा रुग्णालय समोरील गवळीवाडा येथे जनावरे रस्त्यावर सोडली जातात व रस्त्यावर बांधली जात असल्याचे दिसून आले आहे.
आयुक्त डांगे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोमवार पासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या रस्त्यावर व परिसरामध्ये ज्यांची अतिक्रमणे आहेत,त्यांनी ती दोन दिवसात काढून घ्यावीत, अन्यथा महापालिका कठोर कारवाई करेल,असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.अहिल्यानगर शहर अतिक्रमण मुक्त करून शहराची नवी ओळख निर्माण करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.