कर थकविल्याने मंगळवारी महापालिकेच्या पथकाने सावेडी उपनगरातील एक गणपती कारखाना व कॅफेवर कारवाई करत या दोन्ही अस्थापना सील केल्या.इतर दोन मालमत्ताधारकांनी आठवडाभरात पैसे भरतो,असे सांगितल्याने त्यांच्यावरील कारवाई तात्पुरती टळली.

आयुक्त यशंवत डांगे यांच्या आदेशानुसार उपायुक्त प्रियंका शिंदे, प्रभाग अधिकारी बबनराव काळे, कर संकलन अधिकारी विनायक जोशी, कर निरीक्षक ऋषिकेश लाखापती, वसुली लिपिक संजय तायडे, संदीप कोलते, राजेश आनंद, सागर जाधव, किशोर देठे, शंकर अवघडे, गोरक्ष ठुबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सावेडी प्रभागातील वसुली वॉर्ड क्रमांक ४९ मधील मालमत्ता धारक स्मिता कुंदन कांकरिया व ज्योती दाभाडे यांचा नगर मनमाड रोडवरील कोहिनूर मॉलसमोरील मार्क स्केवर अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर एक कॅफे आहे.

या मालमत्तेची करापोटी एकूण थकबाकी ४ लाख २ हजार ७६२ इतकी आहे.त्यामुळे त्यांचा कॅफे सील करण्यात आला. वॉर्ड क्रमांक ४७ मधील बालिकाश्रम रोडवरील भिंगारदिवे मळा येथील मालमत्ताधारक भागवत यांचा गणपतीचा कारखाना असून,त्यांच्याकडे मालमत्ता कराची एकूण थकबाकी रुपये २ लाख ३० हजार १९७ इतकी आहे.

कर भरण्यास मालकाने असमर्थता दर्शविल्याने पथकाने त्याच्या मालकीचा गणपती कारखाना सील केला.दरम्यान सिव्हिल हडको व संभाजीनगर रोडवर येथील दोन मालमत्ता धारकांनी कर थकविल्याने पथक त्यांची मालमत्ता सील करण्यासाठी गेले होते मात्र,आठवडाभरात कर भरण्याबाबत त्यांनी सांगितल्याने त्यांच्यावरील कारवाई तात्पुरती थांबविण्यात आली.

शहरातील ज्या मालमत्ता धारकांकडे कर थकीत आहेत त्यांनी तातडीने भरावा,अन्यथा महापालिकेच्या वतीने थेट मालमत्ता जप्त केल्या जाणार असल्याचे वसुली विभागाच्या वतीने सांगण्यात आले.दरम्यान मनपाची मालमत्ता धारकांकडे तब्बल २१३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.