महापालिकेने महिलांसाठी बनविलेल्या केडगाव उपनगरातील शाहू गार्डनची पुरती दैना झाली आहे.सभोवती टुकार, व्यसनी तरुणांचा राबता, झालेली दुरवस्था यामुळे स्थानिक महिलांनी या गार्डनकडे पाठ फिरवली आहे.
माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या कार्यकाळात नगर शहरातील महिलांसाठी पहिले व एकमेव गार्डन केडगावमध्ये दहा वर्षांपूर्वी उभारले होते.महिलांना दैनंदिन कामकाजातून थोडा मोकळा वेळ मिळावा यासाठी केडगावच्या शाहूनगर भागात मनपाच्या लाखो रुपयांच्या निधीतून शाहू गार्डन सुरू करण्यात आले.
यात महिलांसाठी ‘ओपन जिम’ सुरू करण्यात आली.विविध प्रकारचे महागडे व्यायाम साहित्य या गार्डनमधे ठेवण्यात आले होते.महिलांसाठी वॉकिंग ट्रॅकही तयार करण्यात आला.विविध वन्य दुर्मीळ व औषधी वनस्पतींची लागवड केल्याने गार्डन महिलांसाठी एक पर्वणी ठरले होते.
सुरुवातीचे काही वर्षे महिलांनीही आपल्या लेकरांसोबत या गार्डनचा उपयोग केला.मनपाने काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून गार्डनची देखभाल सुरू केली.मात्र, कोरोनानंतर या गार्डनची देखभाल, साफसफाई करणारे कर्मचारी गायब झाले.
मनुष्य बळाअभावी हे कर्मचारी दुसरीकडे नियुक्त केल्याचे सांगण्यात आले.तेव्हापासून गार्डनकडे दुर्लक्ष झाले.दरम्यानच्या काळात गार्डनमध्ये परिसरातील टुकार तरुणांचा राबता वाढला.व्यसन करणे, रात्री उशिरापर्यंत गार्डन भोवती घिरट्या घालणे.
असे प्रकार वाढल्याने परिसरातील महिलांनी गार्डनकडे सपशेल पाठ फिरवली या गार्डनचे गेटही रात्रभर उघडे असते. यामुळे येथे व्यसन करणाऱ्या तरुणांचा ठेपा तयार झाला आहे.
महिलांच्या व्यायामासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून व्यायामाचे विविध साहित्य या गार्डनमध्ये बसविले होते.मात्र देखभाली अभावी यातील निम्मे साहित्य नादुरुस्त झाले आहे.लहान मुलांच्या खेळण्यांची तुटफूट झाली.
तीन-चार वर्षांपासून साफसफाई कोणीच करीत नसल्याने गार्डन बेवारस पडले आहे.वेगवेगळी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहेत.स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र कचरा पडलेला आहे.झाडांचा पालापाचोळा ही साफ केला जात नाही.
माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यामुळे या परिसरात शाहू गार्डन झाले.मात्र, महापालिकेने दुर्लक्ष केल्याने गार्डनची मोठी दुरवस्था झाली आहे.मनपाने गार्डनची साफसफाई करावी असे शाहूनगर मधील सामाजिक कार्यकर्ते बलभीम कर्डिले यांनी सांगितले.
शाहू गार्डनची व्यवस्था पाहणारे कर्मचारी रजेवर होते त्यामुळे साफसफाई व स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले.मात्र तत्काळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून या गार्डनची साफसफाई केली जाईल असे महापालिकेचे विभाग प्रमुख सुखदेव गुंड यांनी सांगितले आहे.