अहमदनगर महापालिका ३० जून २००३ रोजी अस्तित्वात आल्यानंतर मनपाला पहिले बोधचिन्ह देणारे येथील चित्रकार वसंत विटणकर यांनी महापालिकेच्या नवीन बोधचिन्हावर हरकत नोंदविली आहे.याबाबत त्यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन काही बदल सुचविले आहेत.

३० जून २००३ रोजी अहमदनगर महापालिका अस्तित्वात आली.त्यानंतर मनपाचे बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्य तयार करण्यात आले होते.दरम्यान सर्वोत्कृष्ट बोधचिन्हासाठी मनपाने त्यावेळी स्पर्धा आयोजित केली होती.यावेळी चित्रकार वसंत विटणकर यांनी तयार केलेले बोधचिन्ह निवडले गेले होते.

तेव्हापासून हे बोधचिन्ह मनपाची ओळख बनले होते.दरम्यान, जिल्ह्याच्या नामांतरणानंतर इतर अभिलेखांमध्ये बदल केल्यानंतर महापालिकेने आता बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्यातही बदल केला आहे. ‘विश्वास निरंतर… जनसेवा तत्पर’ हे नवीन ब्रीदवाक्य राहणार आहे.

नवीन बोधचिन्ह आणि ब्रीद वाक्याबाबत मनपाने नागरिकांकडून ११ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या होत्या.तसेच तयार केलेले नवीन बोधचिन्ह मनपाच्या संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या बोध चिन्हाबाबत चित्रकार विटणकर यांनी हरकत नोंदविली आहे.२००३ मध्ये महापालिकेने बोध चिन्हासाठी स्पर्धा आयोजित केली होती.त्यावेळी भास्कर सानप मनपाचे आयुक्त होते.या स्पर्धेत ८० जणांनी सहभाग घेत मनपा प्रशासनाकडे बोधचिन्ह सादर केले होते.

८० जणांमधून विटणकर यांचे बोधचिन्ह निवडले गेले होते.यावेळी विटणकर यांना मनपाकडून बक्षिसापोटी अडीच हजार रुपये, तर मानधन म्हणून १ हजार रुपये देण्यात आले होते.

चित्रकार विटणकर यांनी नोंदविलेल्या हरकतीत म्हटले आहे, बोधचिन्हासाठी असलेले नियम न वापरता बोधचिन्ह साकारले जात आहे,याची खंत आहे.

बोधचिन्ह प्रतीकात्मक व सुटसुटीत असावे,बोधचिन्हाच्या छपाईमागील भावना व कारण पाहताक्षणी स्पष्टपणे जाणवले पाहिजे,त्यात मजकुराचा फाफट पसारा नसावा.

बोधचिन्ह आवश्यकतेप्रमाणे छोटे किंवा मोठे स्पष्ट छापता यावे,असे असावे.बोधचिन्हातून शहराच्या सांस्कृतिक इतिहासाला स्पर्श होऊन वैशिष्ट्यांचाही समावेश असावा असे चित्रकार वसंत विटणकर यांनी सांगितले.