महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहर व परिसरात गेल्या सात महिन्यांत पतंगाच्या मांजात अडकलेले कबुतर, बगळा, वटवाघूळ, घुबड यांचा जीव वाचविला तसेच नालीत पडलेली गाय व विहिरीत पडलेल्या कुत्र्यांनाही सुखरूप बाहेर काढले.अशा एकूण १८ पशुपक्ष्यांना जीवनदान दिले.
आपल्या परिसरात पशुपक्ष्यांचा मोठा वावर असतो.मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात बागडणाऱ्या या जीवांचा रहिवास धोक्यात आला आहे.संक्रांतीच्या काळात पतंग उडविताना बहुतांश जण नायलॉन मांजाचा वापर करतात.हा मांजा पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.
गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी कबुतर, कावळे, बगळे हे वृक्ष, विजेच्या तारा व खांबांवर लटकलेल्या मांजात अडकले. निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी त्यांची सुटका केली,तर काही वेळा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावून त्यांची सुटका केली.
शहरातील पाळीव, तसेच मोकट जनावरे चाऱ्याच्या शोधात असताना नाली, खोल खड्डे यामध्ये पडतात.अशावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बचावकार्य राबवून त्यांची सुटका केली जाते.
शहरात फिरणाऱ्यांना, जनावरांसाठी प्लास्टिक आणि पक्ष्यांसाठी नायलॉन मांजा घातक ठरत आहे.चारा खाताना प्लास्टिक पोटात गेल्याने शहरात अनेक जनावरांचा मृत्यू ओढावला आहे.तसेच मांजात अडकून अनेक पक्षी जखमी झाले आहेत.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला बहुतांशी वेळा रात्री-अपरात्री नागरिक फोन करतात.साहेब कुत्रा विहिरीत पडलाय,गाय नालीत पडली.अशावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य करते.
एकेकाळी अहिल्यानगर शहर व परिसरातील रस्ते, मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, नदी, ओढे, मोकळे भूखंड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष होते.अशा ठिकाणी पक्ष्यांसह जंगली प्राण्यांचा अधिवास होता.
शहराच्या वाढत्या विस्तारामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली.त्यामुळे पक्ष्यांचा अधिवासच नाहीसा झाल्याने शहर, परिसरात आढळणारे अनके पक्षी सध्या दिसेनासे झाले आहेत.
पशू-पक्षी कुठे अडकल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती मिळाली तर आमचे पथक तातडीने घटनास्थळी जावून बचाव कार्य करते.अहिल्यानगर शहर व परिसरात कुत्रे, मांजर, जनावरांच्या बाबतीत अशा घटना कमी घडतात.
मात्र, नायलॉन मांजामुळे विजेच्या तारा, झाडांना पक्षी अडकण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात.पक्षी अडकल्याचे कुणाच्या निदर्शनास आले नाही तर त्याचा जीव जातो.
हे थांबविण्यासाठी पतंग उडविताना कुणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये.हा नायलॉन मांजा पर्यावरण, माणूस तसेच पशू-पक्ष्यांसाठी मोठा घातक आहे.