शहरातील बीएड कॉलेज रस्त्यावर असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांबर नगरपरिषदेने सोमवारी कारवाई केली.कर्मचारी अधिकाऱ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांना निघून जाण्यास सांगितले.यामुळे काही वेळ भाजी विक्रेते व अधिकाऱ्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
नगरपालिकेची ही मनमानी असून अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा नगरपालिकेच्या पथविक्रेता समितीचे सदस्य अॅड. संग्राम जोंधळे यांनी दिला आहे. संगमनेर नगर परिषदेने भाजीपाला विक्रेत्यांना रस्त्यावर हटवले.
त्यामुळे या कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजीपाला विक्रेते एकत्र आले होते.यावेळी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशवराव जाधव, शहराध्यक्ष दत्तात्रय कांडेकर,भाजीपाला विक्रेते माजी सरपंच लांडगे यांच्यासह भाजीपाला विक्रेते उपस्थित होते.
अॅड. जोंधळे म्हणाले, संगमनेर शहरांमध्ये नेहरू चौक, बी. एड. कॉलेज, मालदाड रोड, नवीन नगर रोड अशा अनेक ठिकाणी भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते रस्त्याच्या कडेला आपला व्यवसाय करतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात.
गेल्या २० वर्षांत ज्या प्रमाणात शहराची वाढ झाली,ज्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली,त्या प्रमाणामध्ये नवीन भाजीपाला व फळ विक्रीसाठी मार्केटची सुविधा नगरपालिकेने उपलब्ध करून दिली नाही.
उलट या विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीने ठेकेदारामार्फत ५० रुपयांपासून २००० ३०० रुपयापर्यंत पट्टी वसूल केली जाते. काही वेळेस पावती पण दिली जात नाही.कर वसुल केला जातो परंतु कोणतीही सुविधा नगरपालिकेकडून या विक्रेत्यांना दिली जात नसल्याचाही आरोप केला.
भाजीपाला विक्री,फळविक्री ही अत्यावश्यक सेवा आहे या सेवेचा कोणताही कर नगरपालिकेने घ्यायला नको,परंतु तसे न करता मनमानी पद्धतीने अनेकवेळा नगरपालिका या भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्याचे काम करते.पालिकेच्या अनावस्थेमुळे या लोकांना रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे.यावर पालिकेने उपाययोजना करावी,अशी मागणी केली आहे
नगरपालिकेने सोमवारी भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली मात्र विक्रेत्यांनी विनंती केल्याने एक दिवस त्यांना यातून सूट देण्यात आली आहे.याचा अनेक भाजी विक्रेते गैरफायदा घेत आहे.मंगळवारी नगरपालिका या विरोधात पुन्हा कारवाई करणार आहे असे पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले.
पथविक्रेता समितीकडून नगरपालिकेला इशारा देण्यात येतो की,त्यांनी समितीशी चर्चा केल्या शिवाय मनमानी पद्धतीने कोणतीही कारवाई करू नये.केल्यास मोठ्या प्रमाणात असंतोष आणि आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी नगरपालिकेला ठेवावी लागेल असे पथविक्रेता समितीचे सदस्य अॅड. संग्राम जोंधळे यांनी सांगतले.