काही दिवसांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकांचे वातावरण चालू होते.या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष निवडून येण्यासाठी आपापल्या परीने जोरदार प्रचार करण्यावर भर देत होता.

राजकीय पक्ष,उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह पहायला मिळत होता.या वेळी बऱ्याच ठिकाणी चुरशीच्या लढती बघायला मिळाल्या.

संगमनेर विधानसभा मतदार संघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचीच चर्चा होती.यंदाच्या निवडणुकीत तेच बाजी मारतील आणि मंत्रिपदाला गवसणी घालतील अश्या शक्यता नागरिकांमधून व्यक्त केल्या जात होत्या.थोरात यांच्या विजयाची अपेक्षा येथील मतदारांना होती.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अनपेक्षितपणे झालेल्या पराभवामुळे त्यांच्या समर्थकांमधून हळहळ व्यक्त केली जात असून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे बघायला मिळाले.

राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत आणि सर्वांना पुढे घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून लोक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहात असल्यामुळे त्यांचा नक्की विजय होईल,अशी अनेकांना खात्री होती.

पण मतमोजणी चालू असताना शेवटच्या टप्प्यात त्यांची पिछाडी होऊ लागल्यावर त्यांच्या समर्थकांमध्ये डोळ्यात पाणी दिसू लागले होते.

त्यामुळे थोरात यांच्या पराभवाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.आपल्या नेत्याचा पराभव झाल्याने तालुक्यातील अनेकांच्या घरात दुखाचे सावट पसरले.तर काहींनी स्वतःला घरात बंद करून घेतले.

दरम्यान,थोरात यांना भेटण्यासाठी राज्यभरातील अनेक मान्यवर काल रविवारी (दि. २४) संगमनेर मध्ये आले होते.पराभवानंतरही आमदार थोरात यांनी साकुर भागातील काही गावांना भेटी देऊन नागरिकांचे सांत्वन केले.