मागील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.या निकालानंतर गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यावर एकहाती पकड करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे.उलट भाजपच्या हिंदुत्ववादी विचारांनी मोठी मुसंडी मारत जिल्ह्यात सर्वाधिक अधिक मते घेत नंबर वन पटकावला आहे.
अजित दादांच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यात दमदार यश मिळवले असून महायुतीतील भिडू असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेने चमकदार कामगिरी केली आहे.या उलट पुरोगामी विचारांचा अशी ओळख असणाऱ्या जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती खराब झाली असून उध्दव ठाकरे सेना शेवटच्या स्थानावर फेकली गेली आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी साधारपणे ३८ लाख मतदार आहेत.यातील ७२ टक्के मतदारांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला.जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली.यात महायुतीने महाविकास आघाडीवर सरळसरळ मात केल्याचे दिसत आहे.
विधानसभेच्या १२ जागांच्या निकालात महायुतीला १३ लाख ७७ हजारांहून अधिक मते मिळाली आहे.ऐवढी मते घेवून महायुतीचे १० आमदार निवडून आलेले आहेत.तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला प्रत्येकी एक अशा दोनच जागावर समाधान मानावे लागले.
विधानसभा निवडणुकीचा हाच ट्रेंड जिल्ह्यात कायम राहिल्यास स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूक शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाला जड जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका वेगवेगळ्या मुद्यावर लढल्या जात असल्या तरी पक्षीय ताकद आणि कार्यकत्यांचे संघटन यावर निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदान यंत्राबाबत वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आणि संशय व्यक्त करण्यात येत असला तरी मतदारसंघ आणि पक्ष निहाय मिळालेल्या मतांच्या आकडेवारी पाहता भाजपने राष्ट्रवादीला मागे लोट आपली राजकीय पकड आणखी मजबूत केल्याचे दिसत आहे.या उलट राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला शह बसला आहे.
महायुतीची महाविकासावर दुप्पटीने मात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाला मिळालेल्या मतांची गोळा बेरीज केली असता ती १३ लाख ७७ हजार १६३ वर पोहचली आहे.तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ६ लाख ८४ हजार ४२ मते मिळवली आहेत.
महायुतीने जिल्ह्यात महाविकास आघाडीवर ६ लाख ९३ हजारांची आघाडी घेतलेली असून ती दुप्पट असल्याने जिल्ह्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व ठेवले असल्याचे स्पष्ट होत आहे.
सहा महिन्यांत महायुतीचे जोरदार कमबॅक झाले.सहा ते सात महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नीलेश लंके यांनी विजय संपादन करत ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळवली होती.
त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या डॉ. सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मते मिळाली होती.तर शिर्डीत महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी ४ लाख ७६ हजार तर महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांनी ४ लाख २६ हजार मते मिळवली होती.मात्र,गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात महायुतीने सांघिक काम करत मोठे यश मिळवले आहे.