सत्तेचा सारिपाट फिरता असतो.आमदारकी गेली तरी कार्यकर्त्यांचा पाठबळ ऊर्जा देणारे आहे.पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्याने उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही माजी आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली.पाथर्डी, नगर परिसरातील जनतेने विकासाला पाठबळ देत भरभरून मते दिली.
राहुरी येथील आभार सभेत बोलत असताना ते म्हणाले,राहुरीतील घटलेल्या मतांचे अवलोकन करू.भविष्यातील यशासाठी पाठबळ द्या असे आवाहनही तनपुरे यांनी केले.तनपुरे म्हणाले, १५ वर्ष आमदारकी नसताना संघर्ष केला. २०१९ मध्ये यश मिळाले.शरद पवार यांनी यशाला पाठबळ दिले.
आमदारकीसह नामदारकी मिळाली.६ खात्याचे राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर अडिच वर्षे विकास समोर ठेवला.शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न प्रमाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला.सत्ता बदलानंतरही विरोधी आमदार म्हणून जनतेच्या प्रश्राला प्राधान्य दिले.
परंतू यंदाची निवडणूक विकासाच्या नव्हे तर वेगळ्याच मुद्यावर झाली.चुकीचा प्रचार करून मते मिळविण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला.लाडकी बहिण तसेच विविध शासकीय योजनांच्या नावाखाली निवडणूक जिंकल्याचा दावा सत्ताधारी करत असले तरी लाडक्या बहिणींना सावत्र भावाची वागणूक देण्यासाठी नियमावली लादण्याचा प्रकार घडत असल्याचे समजले आहे.
२०१९ पूर्वी कोणताच अनुभव नसताना संघर्ष केला.आता माजी राज्यमंत्री म्हणून सत्तेत व विरोधात काम केल्याचा मोठा अनुभव आहे.सत्ताधारी गटाकडून कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यास खंबीरपणे उभे राहणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर संतोष आघाव यांनी सूत्रसंचालन केले.बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर, बाळासाहेब जठार, मच्छिंद्र बेरड, तुळशिराम शिंदे, आबासाहेब काळनोर,सुनिल मोरे, प्रकाश देठे, अभिजित ससाणे, राजेंद्र भगर, रघुनाथ झिने यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे रावसाहेब चाचा तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, प्रेरणा पतसंस्थेचे सुरेशसेठ वाबळे, सागर तनपुरे, कांता तनपुरे, अॅड. केरू पानसरे, वर्षाताई बाचकर, सुरेशराव लांबे, विजय तमनर, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे,निलेश जगधने, बाळासाहेब उंडे, अनिल कासार, सुरेशराव निमसे, संभाजीराजे तनपुरे उपस्थित होते.