भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रिपद शपथविधी सोहळ्याचा आनंददायी क्षण लोणी ग्रामस्थांनी जल्लोषात साजरा केला.शिर्डी मतदारसंघात मंत्री विखे पाटील यांची मंत्रिपदी झालेल्या निवडीचा जल्लोष करण्यात आला.शपथविधी सोहळा ग्रामस्थांनी सामूहिकपणे पाहण्यासाठी लोणी बुद्रुक गावात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.
आबालवृद्धांनी या ठिकाणी गर्दी करून, शपथविधी सोहळ्याचा आनंद घेतला.शपथविधी सोहळ्याचा आनंद ग्रामस्थांनी फटाके आणि डोलताशे वाजवून द्विगुणीत केला.
मंत्री विखे पाटील यांनी शनिवारी ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचे दर्शन घेऊन तसेच गावातील यात्रेत काहीकाळ सहभाग घेतला.त्यानंतर ते शपथविधी सोहळ्या करिता नागपूरकडे रवाना झाले.
दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा पाहण्यासाठी गावातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर तसेच म्हसोबा महाराजांच्या मंदिराजवळ स्क्रिन लावण्यात आले होते.या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोरही फटाक्यांची आतषबाजी करून, पेढे आणि मिठाईचे वाटप करून हा आनंद सोहळा साजरा करण्यात आला.जनसेवा कार्यालय लोणीच्या प्रांगणातही फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.
विखे पाटील यांच्या नावाची घोषणा होताच युवकांनी भारतीय जनता पक्ष तसेच विखे पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन जल्लोष केला.फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी नाचण्याचाही आणि फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नाहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजितदादा पवार यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी यशस्वी करण्याचा प्रयत्न माझा राहील.
शिर्डी मतदारसंघातील जनतेनेही ऐतिहासिक मताधिक्याने मला विजयी केले त्यांचाही विश्वास विकास कामांमधून सार्थ ठरविण्यासाठीच भविष्यात काम करणार असल्याचे शपथ विधीनंतर मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.