विधानसभा निवडणुका झाल्याने आता महापालिका वर्तुळात निवडणुकीचे वेध लागले आहेत.अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी फिल्डिंग लावली आहे.मात्र, कोणत्या पक्षातून निवडणूक लढविली, तर विजय सुकर होईल याची सध्या चाचपणी सुरू आहे.
त्यामुळे अनेकांनी शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संधान बांधल्याचे बोलले जात आहे.राज्यात विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या असून,जनतेने महायुतीला कौल दिला आहे.आता जनता सरकार स्थापनेची वाट पाहत आहेत.
राजकारणाची पहिली पायरी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अनेकांना वेध लागले आहेत.राज्यात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांवर गेल्या काही महिन्यांपासून प्रशासक राज आहे.
विधानसभा निवडणुका पार पडल्याने लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या,अशी अनेकांची मागणी आहे. अहिल्यानगर महापालिकेची मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपुष्टात आलेली आहे.सध्या महापालिकेत आयुक्त यशवंत डांगे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.
ओबीसी आरक्षण व काही तांत्रिक मुद्यांमुळे निवडणुका लांबल्या होत्या.आता विधानसभा निवडणुका झाल्याने महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.त्यामुळे नगर शहरात अनेक इच्छुकांनी नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
क्रीडा स्पर्धा, खेळ पैठणीचा, गुणवंत सत्कार अशा विविध कार्यक्रमांतून नागरिकांशी संपर्क वाढविला आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनी ऐन वेळी उमेदवारांची अदालाबदल केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अनेक ठिकाणी भाजपातून उमेदवार आयात केले.तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही भाजपातील नेत्यांना उमेदवारी देऊन विजय मिळविला.
आता महापालिकेत तोच कित्ता गिरवला जाणार असल्याचे बोलले जात आहे. २०१८ मध्ये पालिकेत १७ प्रभागांत प्रत्येकी चार असे ६८ नगरसेवक निवडून आले होते.त्यात शिवसेनेचे २४ नगरसेवक होते.त्यात शिवसेना फुटीनंतर बोटावर मोजण्याइतके नगरसेवक शिंदे सेनेसोबत गेले.
अन्य नगरसेवक उबाठा सेनेत होते.विधानसभा निवडणुकीत मात्र उबाठा सेनेची मोठी पीछेहाट झाली.त्यामुळे आता अनेक माजी नगरसेवकांनी पक्षबदलाच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.
मात्र, त्यासाठी विजयाची खात्री देऊल अशी जागा शोधून शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा अनेकांचा इरादा असल्याचे समजते.माजी मंत्री स्व.अनिल राठोड यांच्या निधनानंतर शहरात शिवसेनेला खमके नेतृत्व मिळाले नाही.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला.अनेक माजी नगरसेवक महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय नव्हते.महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी अशी युती असताना आमदार संग्राम जगताप यांनी अनेकांना मदत केली होती.
त्यामुळे अनेकांनी विधानसभा निवडणुकीत त्यांना मदत केल्याचे बोलले जाते. काहींनी थेट महायुतीच्याच उमेदवाराला पाठिंबा दिला.आताही शिवसेनेतील सुमारे ११ जण बाहेर पडण्याची शक्यता असून,तशा बैठकाही झाल्याचे समजते.सरकार स्थापनेनंतर त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.