श्रीगोंदा जिरायती तालुका आहे,या तालुक्यासाठी पाण्याचे नियोजन करणे हेच माझे पहिले काम असणार आहे. एमआयडीसीचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच उद्योग आजून तालुक्यासाठी रोजगार निर्मिती निर्माण होईल,असा विश्वास नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी व्यक्त केला आहे.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या ४५ वर्षांच्या अनुभवाच्या शिदोरीचा उपयोग करुन घेणार असल्याचे त्यांनी सप्ष्ट केले, श्रीगोंदा मतदारसंघाचे नूतन आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

आमदार पाचपुते म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील जनता कोणतीही लाट मान्य करीत नाही.१९८० मध्ये श्रीगोंदा येथे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सभा झाली.त्यावेळी देखील बबनराव पाचपुते हे जनता पक्षाच्या वतीने विजयी झाले होते.लाटेच्या विरोधात मतदान करणारा हा मतदारसंघ आहे.

इथली प्रत्येक निवडणूक वेगळी असते.लोकसभा, विधानसभा अशा प्रत्येक निवडणुकीला वातावरण वेगळे असते.यंदाची विधानसभा निवडणूक आम्ही गंभीरतेने घेतली,आमचे विरोधक सोशल मीडियावर प्रचार करीत होते.त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो,त्यामुळे सहजासहजी यश मिळत गेले.

मला मिळालेल्या दहा मतांपैकी सहा मते बबनदादांच्या नावानेच मिळालेली आहेत.ही त्यांच्या कामाचीच पावती असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.आमदार पाचपुते म्हणाले की, मी बबनदादांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.त्यांच्या ४५ वर्षांच्या अनुभवाचे मार्गदर्शन लाभणार आहे.त्यामुळे मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मला मोठी मदत होणार आहे.

२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात एकदा दादांना पराभवाला सामोरे जावे लागले,तरीही जनतेची कामे करीत राहिलो. या काळात दादांकडून संयम शिकलो.दादांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी चोख पार पाडली आहे.त्यांनी कधीही कोणत्या पदाचा मोह पाळला नसल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी पाच वर्षांत जिरायती भाग पाणीदार कल्यासाठी अथक परिश्रम करणार आहे.ज्यावेळी आमदार चांगली बाजू मांडतो,तेव्हा तालुका बागायती होतो त्यासाठी तालुक्याला बागायती करण्यासाठी आमदार म्हणून सातत्याने चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या मतदारसंघात रस्त्यांचे कामे सुरु आहेत.ते लवकरच पूर्ण होतील,पाणी उपलब्ध झाल्यास वीजपुरवठा अभावी पिके वाया जाऊ नयेत यासाठी वीजपुरवठा कायमचा कसा राहिल याचे नियोजन देखील केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेलवंडी येथे एमआयडीसी मंजूर झाली आहे.त्यासाठी जागाही अंतिम झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच बाहेरील मोठे उद्योग येऊन स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.त्यामुळे एमआयडीसी कशी लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले.