विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर सरकारही स्थापन झाले आहे.आता नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेध इच्छुकांना लागले आहेत.मिनी मंत्रालयाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत इच्छुकांकडून गावखेडे पिंजून काढले जात असल्याचे दिसून येते.जुन्या रचनेनुसार निवडणूक होणार की नव्याने रचना होणार,आरक्षण कोणाचे निघणार? याकडे लक्ष न देता इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे.

आरक्षणाचा विचार न करता संगमनेर तालुक्यातील आश्वी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून विजय हिंगे, भाजपाकडून भारतराव गीते आणि अॅड. अनिल भोसले यांच्याकडे इच्छुक म्हणून पाहिले जाते.आश्वी गट संगमनेर तालुक्यात असला तरी शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे.त्यामुळे उमेदवार कोणी असला तरी खरी लढत ही विखे-थोरात यांच्यात पहावयास मिळेल,अशी चर्चा आहे.

प्रवरा पट्ट्यातील गावे आश्वी गटात येतात.विखे कुटुंबाची या भागाशी जवळीक आहे.त्यामुळे आश्वी गट हा आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो.विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून व जुना ऋणानुबंध पाहता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही प्रभाव परिसरावर आहे.

मिनी मंत्रालयाच्या आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये विखे थोरातातील राजकारण सोईचे दिसले,मात्र गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकाच पक्षात (काँग्रेस) असतानाही विखेंनी जोर्वे गटात तर थोरातांनी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देत प्रतिष्ठा पणाला लावली होती.पण दोन्ही गटात अपक्षांच्या पदरी निराशा आली.

यातून मात्र मिनी मंत्रालयासाठी विखे-थोरातांमध्ये वादाची ठिणगी पडली.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तर दोघांतील राजकीय संघर्ष विकोपाला पोहचल्याचे दिसून आले.एकमेकांच्या मतदारसंघात जात एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप झाले.यात संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला.

अमोल खताळ या नवतरुणाला आमदारकीची संधी मिळाली.खताळ यांच्यामागे विखे पाटील यांचे राजकीय पाठबळ उभे राहिल्यानेच थोरातांना पराभव पत्कारावा लागल्याची चर्चा झडत आहे.बाळासाहेब थोरातांच्या पराभवामुळे विखे समर्थक कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे गणित मात्र वेगळे असते.

त्यामुळे दोन्ही बाजुने विजयासाठी संघर्ष होवून मिनी मंत्रालयाच्या सत्तेसाठी घमासान होण्याची चिन्हे आहेत.आश्वी जिल्हा परिषद गटात विविध जाती धर्मासोबतच सुशिक्षित मतदार आहेत.सगेसोयऱ्यांचा हा गट बागायतदार असला तरी कायम विखे-थोरातांभोवती राबता असल्याचे दिसते.

सहकारच्या माध्यमातून विखे-थोरात दोघांचेही वर्चस्व आहे.विधानसभा निवडणुकीत राजकीय गणिते बदलली असल्याने त्याचा परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

विजय हिंगे यांनी आश्वी गटातून काँग्रेसकडून मोर्चेबांधणी चालविली आहे.तर भाजपकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे भारतराव गीते व अॅड. अनिल भोसले तयारीला लागले आहेत.विखे-थोरातांकडे तुल्यबळ कार्यकर्ते असल्याने आश्वी गटाची जिल्हा परिषद निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषद निवडणूकीच्या मैदानात उरण्यास इच्छुक असणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : विखे गटाकडून – अॅड. अनिल भोसले, भारतराव गिते, अॅड. पोपट वाणी, तबाजी मुन्तोडे, मच्छिंद्र थेटे, निवृत्ती सांगळे यांच्यासह सुनिल मुन्तोंडे, अनिल म्हसे, मोहीत गायकवाड, अशोक जन्हाड, विकास गायकवाड.थोरात गटाकडून – विजयराव हिंगे, गणपत सांगळे, डॉ. संजय सांगळे, राजेंद्र चकोर, प्रमोद बोंद्रे.