काँग्रेस नेत्यांनी पक्षाची एवढी दैन्यावस्था कशी झाली याबाबत आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.मी राज्याचे नेतृत्व करत असतांना ८२ जागा निवडून आणल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी ८२ जागांच्या ४२ केल्या.आता नाना पटोलेनी ४२ वरून १६ जागा आणल्या.
याबद्दल काँग्रेस नेत्यांनी आकलन करावे,असा सल्ला देत, काँग्रेसने आताच रडीचा डाव सुरु केला आहे. २०२९ मध्येही ते निवडूनही येणार नाही.त्यामुळे त्यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यास सुरवात केली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहपरीवार शिर्डीत येवून साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावली.समवेत कन्या नवनर्वाचित आ.श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या.दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने मंदीर प्रमुख विष्णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा साईमूर्ती व शाल देवून सत्कार केला.
मला त्रास देणारे घरी बसले या आपल्याच वक्तव्यावर चव्हाण यांनी साईदरबारी माध्यमांशी बोलतांना खंत व्यक्त केली. मी साईबाबांचा भक्त असल्याने मला कुणावरही विनाकारण टीका करायचा उद्देश नव्हता.मात्र मी चौदा वर्षे पक्षात वनवास भोगला.
त्यामुळे मी रागाच्या भरात बोललो असेल.त्यामुळे त्यांनी मनावर घेऊ नये, राजकारणात हार जीत होतच असते. मात्र त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.दोन अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर साहजिकच मनात दुःख असते.
मात्र एकनाथ शिंदे कुठेही नाराज असल्याचे दिसत नाही.महायुतीच्या सरकार स्थापनेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही असे त्यांनी सांगितले.संजय राऊत यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्याच्या जागा कमी झाल्या त्याबद्दल त्यांना काय वाटतय यावर अधिक भाष्य करणे योग्य राहील.
आमच्या सरकार मध्ये कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार यांची चिंता त्यांनी करु नये.विरोधकांकडे राज्यसभेवर उमेदवार निवडून आणण्याइतकेही संख्याबळ नसल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.