विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगलाच दणका बसला.यामुळे येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांना दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांना जपत एकसंघ ठेवण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात महायुतीचा वारं सुसाट असल्याचे चित्र असून त्याला महाविकास आघाडी कशा प्रकारे वेसन घालणार हे पाहावे लागणार आहे.
नगर जिल्हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असताना विधानसभा निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत महाविकास आघाडीच्या नेत्यांना धोबीपछाड दिली.
महायुतीच्या सुनामीत महाविकास आघाडी आणि त्यांचे नेते चांगलेच गारद झाले असून येणाऱ्या पंचायत राज संस्थांसह नगर महापालिका, नगर परिषद निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांना पुन्हा लढण्यासाठी उभे करण्याचे काम महाविकास आघाडीतील घटक पक्षांना करावे लागणार आहे.
नगर जिल्हा अनेक वेळा राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरलेला आहे.अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नगरची ओळख होती.आतापर्यंत या दोन्ही पक्षांना जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून दान दिले आहे.
मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या संघर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाला प्रत्येकी अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.
यामुळे येणाऱ्या पंचायत समिती आणि अन्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आतापासून कंबर कसून कामाला लागणार आहे.याठिकाणी महायुतीने कब्जा केल्यास महाविकास आघाडी आणि नेत्यांचे राजकारण अवघड होणार आहे.
येत्या काही महिन्यांत जिल्ह्यात विविध निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासून तयारी सुरू करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाचे कार्यकर्ते, मतदार यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तालुकानिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत.आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढत पुढील राजकीय वाटचाल करण्यात येणार आहे असे जयंत वाघ, (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस) यांनी म्हंटले आहे.
होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरची महापालिका निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पूर्ण ताकदीने लढवणार आहे.अद्याप पक्षीय पातळीवरून सूचना नसल्या तरी कार्यकर्ते येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत असे शशिकांत गाडे,(जिल्हाध्यक्ष, उद्धव ठाकरे गट) यांनी म्हंटले आहे.
विधानसभेचा असा निकाल अपेक्षित नव्हता. निकालानंतर अनेक गोष्टीवर शंका उपस्थित करण्यात येत आहेत.त्यावर पक्षीय पातळीवरून निर्णय होणार असून आगामी निवडणुकांसाठी पक्ष आणि कार्यकर्ते तयार आहेत.यामुळे अडचण नाही.असे राजेंद्र फाळके ( जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांनी म्हंटले आहे.