Ahilyanagar News : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासांवर येऊन ठेपला आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर इच्छुकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. भाजपसह शिवसेने नेते फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली असल्याची दिसून येत आहे.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार, याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. विस्तारात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
मात्र पक्षातून आ. मोनिका राजळे, विधान परिषद सदस्य राम शिंदे आणि आ. शिवाजीराव कर्डिले यांचे देखील नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे शिवसेनेतून संधीबाबत कोणतीही चर्चा नसताना राष्ट्रवादीकडून जिल्ह्यातून आमदार आशुतोष काळे व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर सर्वांच्या नजरा रविवारी हिवाळी अधिवेशनच्या तोंडावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर आहेत. या विस्तारात जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार, याविषयी आठवडाभरापासून चर्चा झडत आहेत.
आ.राधाकृष्ण विखे पाटील रविवारी शपथ घेणार, याचा विश्वास त्यांच्या समर्थकांत आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना आ. विखे यांनी आगामी शंभर दिवसांचा आराखडाही बोलून दाखविला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेटही घेतली.
यातून त्यांना संधी निश्चित असल्याचे संकेत मिळाले. महायुतीला साथ देणाऱ्या जिल्ह्यातून आणखी एकाला भाजप संधी देणार, अशी चर्चा आहे. आ. मोनिका राजळे, आ. राम शिंदे, आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यापैकी कोण मंत्री होणार, याची चर्चा सुरू आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाला संधी देणार, हा विषय अनुत्तरित आहे. सेनेकडून आ. विठ्ठल लंघे समर्थकांनी मंत्रिपदाची अपेक्षा ठेवली आहे. तर राष्ट्रवादीकडून आ. आशुतोष काळे व आ. संग्राम जगताप यांच्यापैकी कोण मंत्री होणार, याबाबत समर्थकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र त्या दिशेने ठोस हालचाली नसल्याने सारेच संभ्रमात आहेत. आज दुपारपर्यंत याबाबत स्पष्टता येणार आहे.