Ahilyanagar News : नगर शहरासह ग्रामीण भागातील अनेक मतदारांना मतदार यादीतील गोंधळामुळे कुठे बोगस मतदान झाल्याने काहींना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागले. तर काहींची नावेच मतदार यादीत नसल्याचे दिसून आले.
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे एक युवक स्लिप घेऊन मतदान करण्यासाठी गेला असता त्याला कर्मचाऱ्यांनी त्याचे मतदान झाल्याचे सांगितले. कोणीतरी त्याच्या नावाने बोगस मतदान करून गेल्याचा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया या युवकाने दिली.
नेवासा तालुक्यातील घोडेगावात एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असलेल्या याद्यांते होती. त्यामुळे दोन महिलांना मनस्ताप सहन करावा लागला. याच मतदान केंद्रावर काही मतदारांनी ओळखपत्र सोबत नेले होते, परंतु त्यांना यादीतील क्रमांक माहिती नसल्याने चक्क त्यांना बूथमधून बाहेर काढण्यात आले.
या मतदान केंद्रावर शाळेच्या पडवीमध्ये मोठ्या रांगा लागल्याने दुपारच्या वेळी अनेक मतदारांना उन्हात उभे राहून रांगेत मतदान करावे लागले.
मतदान न करताच निघून गेले
काही ठिकाणी मतदान केंद्राबाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी चुकीच्या खोल्यांच्या स्लिप वाटल्याने अनेक मतदार वेगळ्याच रांगेत मतदानासाठी ताटकळत उभे राहिले खोलीत गेल्यानंतर त्यांना येथे आपला मतदार क्रमांक नसल्याचे समजल्याने बाहेर पडावे लागले यामुळे अनेक मतदारांनी मतदान न करताच निघून जाणे पसंत केले.