Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाची मतदान यंत्रे (ईव्हीएम) ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉगरूम बाहेर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या सहकाऱ्यांनी २४ तास पहारा ठेवला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम ठेवलेल्या गोदामांवर लक्ष ठेवण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी तंबूची व्यवस्था केली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदासंघात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात हायहोल्टेज लढत झाली. ४ जून रोजी ईव्हीएम मशिनमध्ये बंद झालेल्या मतांची मोजणी होणार आहे.

तोपर्यंत संपूर्ण मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम मशीन नगरच्या एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गोदामाभोवती केंद्र, व राज्य राखीव दला बरोबरच व स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून या परिसरातील वाहतूक दुसऱ्या मागनि वळवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला दिवसातून दोनदा गोदामांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी गोदामाबाहेर स्वतंत्र तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून ओळखपत्रे देण्यात आलेल्या प्रतिनिधींना तिथे प्रवेश देण्यात येत आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या वतीने १५ प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली असून दोन पाळ्यांमध्ये हे प्रतिनिधी डोळ्यात तेल घालून या व्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहेत. या तंबूमध्ये स्ट्राँगरूमसह इतर भागात बसविण्यात आलेल्या गोदामातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी उमेदवाराच्या प्रतिनिधींना सीसीटीव्ही स्क्रिनवर करता येते.