Maharashtra News
Maharashtra News

लोकसभा निवडणुकीनंतर देशात ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास अयोध्येतील राम मंदिराला टाळे लावले जाईल, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी केली.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाबरोबरच भाजपने १९० जागा खिशात घातल्या आहेत. आता चौथ्या टप्प्यात भाजप ४०० जागा जिंकण्याच्या दिशेने दमदारपणे वाटचाल करीत आहे. उत्तर प्रदेशात सप, बसप व काँग्रेसचा सुपडा साफ होणार असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी मतदारसंघातून नशीब आजमावणारे भाजपचे उमेदवार अजय मिश्रा ‘टेनी’ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबोधित केले.

काँग्रेसने ७० वर्षांपासून राम मंदिर मुद्याला न्यायालयात प्रलंबित ठेवले. पण नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. तेव्हा त्यांनी राम मंदिराचा कायदेशीर तिढा सोडवला. त्यानंतर, त्यांनी भूमिपूजन करून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. या सोहळ्याचे निमंत्रण सर्वच राजकीय पक्षांना दिले.

मात्र, काँग्रेस व इतर पक्षांच्या नेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली. आता समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी राम मंदिर बांधणे निरर्थक असल्याचे वक्तव्य केले.

पण, आता जनतेने सूज्ञपणे भाजपला मतदान करावे. अन्यथा रामगोपाल व ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष राम मंदिराला टाळे ठोकतील, असा प्रहार त्यांनी केला. लखीमपूर खिरीत अनेक नागरिकांकडे भारताचे नागरिकत्व नाही. त्यांना नागरिकत्व मिळाले पाहिजे.

म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ (सीएए) आणला आहे. पण, राहुल गांधी व अखिलेश यादव हे सीएए रद्द करण्याची भाषा करीत आहेत.

वास्तविक पाहता या दोन्ही नेत्यांमध्ये सीएए हटवण्याची धमक नाही, अशा शब्दांत अमित शाह कडाडले. ‘इंडिया’ आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. नेता, नीती व नियत सुद्धा नाही, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस, सप व बसपचे नेते खोटा प्रचार करून भाजप आणि नरेंद्र मोदींना बदनाम करीत आहेत.

मोदींना ४०० जागा मिळाल्या तर आरक्षण संपुष्टात येईल, असा सूर ते आळवत आहेत. पण, काँग्रेसने कर्नाटकात मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दिले.

अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण कापून त्यांनी मुस्लिमांचे लांगूलचालन केले, अशी तोफ शाह यांनी डागली.