लोकसभा निवडणुकीत तीन टप्प्यांतील मतदान प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची डळमळीत होत आहे. त्यामुळेच ते स्वतःच्याच मित्रांवर टीका करीत आहेत,
असा जोरदार पलटवार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला. मोदींच्या भाषेवरून निवडणुकीचा खरा प्राथमिक अंदाज समोर येत असल्याचे ते म्हणाले.
तर लोकसभा निवडणुकीचे वारे पाहता नरेंद्र मोदी हे स्वतःच्याच सावलीला घाबरले आहेत, असा प्रहार काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला.
‘अदानी-अंबानी’ यांच्यावरील टीकेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणातील प्रचार सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
त्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटरवरून मोदींवर पलटवार करीत म्हटले की, काळ बदलत आहे. ‘दोस्त दोस्त ना रहा’, हे खरे होत आहे. तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर नरेंद्र मोदी स्वतःच्याच मित्रांवर टीका करीत आहेत.
यावरून त्यांची खुर्ची डळमळीत झाल्याचे स्पष्ट होत आहे, असा टोला खरगे यांनी लगावला. तर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, निवडणुकीचे रूप झपाट्याने बदलत आहे.
‘हम दो हमारे दो के पप्पा’ आता आपल्याच मुलांवर टीका करीत आहेत. हा पराभव होत असल्याचा निवडणूकपूर्व अंदाज आहे. पंतप्रधान मोदी स्वतःच्याच सावलीला घाबरले आहेत, असे सांगत रमेश यांनी मोदींचे एक छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले.
ज्या व्यक्तीने स्वतःच्या पक्षासाठी ८,२०० कोटींचे निवडणूक रोखे गोळा केले. हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घोटाळ्याला घटनाबाह्य घोषित केले.
तीच व्यक्ती आता दुसऱ्यांवर आरोप करीत आहे. पण लक्षात ठेवा. मोदींनी चार मार्गांनी त्यांच्या विश्वासू लोकांना ४ लाख कोटींचे करार व परवाने दिले आहेत.
त्या बदल्यात देणग्या पदरात पाडून घेतल्या. आजघडीला २१ भारतीय अब्जाधिशांकडे ७० कोटी भारतीयांच्या बरोबरीची संपत्ती आहे. हे सर्व मोदींचे इरादे व धोरणामुळे घडले आहे, असा आरसा जयराम रमेश यांनी दाखवला.